अमरावती- मागील ३ दिवसापासून जिल्ह्यात व मध्यप्रदेशात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे, पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे व अमरावती शहराला पाणी पुरवठा करणारा मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा धरण हे १००% भरले आहे. त्यामुळे, काल या धरणाचे सर्व १३ दरवाजे उघडण्यात आले.
आज धरणात पाण्याची आवक वाढल्याने हे दरवाजे आता २ मीटर उंच करण्यात आले आहे. त्यामुळे, वर्धा नदीला मोठा पूर आला आहे. यामुळे जिल्ह्यातील कौंडण्यपूर येथून वर्धा जिल्ह्याला जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. तर, दिवसा तालुक्यातील नमस्कारी गावालासुद्धा पाण्याने वेढा घातल्याने गावाचा संपर्क तुटला आहे.
सध्या अप्पर वर्धा धरणातून ३ हजार ७०८ क्युमेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे, नदीकाठी वसणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील सर्वच पाणी प्रकल्पातील जलसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प असलेल्या शहानूर धरणात ९१ टक्के, चंद्रभागा धरणात ९२.५१ टक्के, पूर्णा धरणात ८४.९० टक्के, तर सपन धरणात ८१ टक्के जलसाठा झाला आहे. तसेच, जिल्ह्यातील छोटे पाणी प्रकल्प आणि नद्या नाले देखील दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे, यावर्षीचा पाणी प्रश्न मिटला असला तरी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
हेही वाचा-जानेवारी महिन्यात शाळा सुरू होण्याची शक्यता; शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचे संकेत