अमरावती- जिल्ह्यात दिवसेंदिवस विविध प्रकारच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. अशातच आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे नेहमीच संकटात सापडत असलेल्या शेतकऱ्यांसोबत आता बियाण्यांमध्ये सुध्दा फसवणुक होत असल्याचे पुढे येत आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड (कसबा) येथून अनधिकृत कपाशी बियाणे जप्त करून दोन आरोपींना अटक केल्याची कारवाई स्थानिक पोलीस व कृषी विभागाने संयुक्तरित्या रविवारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान केली आहे. यामध्ये एक आरोपी फरार झाला आहे. यात २९ हजार १४६ रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
६ हजार १३६ रूपयांचे अनधिकृत बियाणे जप्त
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २३ मे रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अमरावती कृषी विभागाचे कृषी विकास अधिकारी उज्वल आगरकर, अमरावती जि. प. चे जिल्हा कृषी अधिकारी अजय तळेगावकर, कृषी विभागाचे अनंत मस्करे, दादासो पवार तसेच चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश मुपडे, पोलीस कॉन्स्टेबल शरद खेडकर या पथकाने चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड (कसबा) येथे जाऊन एका ठिकाणी झडती घेतली. आरोपी साहेबराव मेथाजी राठोड (वय ३२ वर्ष) रा. मांजरखेड यांच्याकडून ३०२८-४ जी अशा नावाचे प्रत्येकी ४५० ग्रॅमचे २ पॉकेट, आर कॉट ६५९-४ जी नावाचे प्रत्येकी ४५० ग्रॅमचे २ पॉकेट, सिकन्दर प्लस प्रत्येकी ४५० ग्रॅमचे २ पॉकेट व विजया हायब्रीड कॉटन सीड प्रत्येकी ४५० ग्रॅमचे २ पॉकेट असे एकुण ८ पॉकेट किंमत ६ हजार १३६ रूपयांचे अनधिकृत बियाणे जप्त करण्यात आले आहे.