अमरावती : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी रात्री अमरावतीत पोहोचले आहेत. आज संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्या अमरावती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हनुमान चालीसा पठण करून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.
रात्री उशिरापर्यंत राणा समर्थकांचा धिंगाणा :उद्धव ठाकरे यांच्या अमरावती दौऱ्यादरम्यान राणा समर्थकांनी उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी लागलेले पोस्टर फाडले. उद्धव ठाकरे हे संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे शिवसैनिकांना संबोधित करणार आहे. या ठिकाणी लावण्यात आलेले पोस्टर राणा समर्थकांनी फाडले. यामुळे रात्री बारा वाजेपर्यंत तणावाचे वातावरण होते. रविवारी सकाळी 11 वाजता शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी पोस्टर लावत असताना कॅम्प परिसरात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांचा निषेध व्यक्त करीत हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा देण्यासंदर्भात लावलेले पोस्टर आढळून आले. यामुळे संतप्त शिवसैनिकांना राणा समर्थकांनी लावलेले सर्व पोस्टर फाडून फेकल्यामुळे राणा समर्थकांनी शिवसैनिकांविरोधात शहरातील राजकमल चौक कॅम्प परिसर, संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन या ठिकाणी पोस्टर फाडून धिंगाणा घातला.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त :राणा दाम्पत्य आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर आज राणा समर्थक शहरात धिंगाणा घालू शकतात, त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा संपूर्ण शहरात कडेकोट बंदोबस्त आहे. उद्धव ठाकरे हे रात्री शासकीय विश्राम भवन येथे मुक्कामाला होते. या ठिकाणी पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी आणि तपासणी करूनच त्यांना पोलीस आत सोडत होते. गर्ल्स हायस्कूल चौक येथे राणादाम्पत्य हनुमान चालीसा पठण करणार आहे. या ठिकाणी देखील पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.