अमरावती Two Tribal Children and Mothers Died : मेळघाटातील दुर्गम भागात कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू यावर नियंत्रण राखण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर संपूर्ण शासकीय यंत्रणा अवलंबून आहे. आता 23 दिवसांपासून कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळं, मेळघाटातील आरोग्याच्या समस्या प्रचंड उफाळून आल्या आहेत. मेळघाटातील फुलोरी या गावात दिवाळीच्या (Diwali) दोन दिवसाआधी, लक्ष्मी कमल सिंह भिलावेकर आणि संजना धांडे या दोन मातांचा उपचाराअभावी मृत्यू झाला आहे. तसंच धारणी उपजिल्हा रुग्णालयात दोन बालकं देखील दगावली आहेत. मेळघाट प्रमाणे संपूर्ण अमरावती जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा पार कोलमडली आहे.
कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी आंदोलन: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत गत चार ते पाच वर्षांपासून सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं शासनाने नियमित समायोजन करावं, यासाठी 24 दिवसांपासून देशभरातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी आंदोलन करत आहेत. अमरावती शहरात भाऊबीज निमित्त आंदोलन करणाऱ्या कंत्राटी आरोग्य कर्मचारी महिलांनी, जिल्हा परिषदेचे अधिकारी संतोष जोशी यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचं औक्षण केलं. तसंच सरकारनं नोकरीत कायम करण्यासाठी आपल्या वतीनं सहकार्य करून मदत करावी अशी मागणी देखील त्यांनी केली.
जिल्ह्यात साडेतेराशे कर्मचारी संपावर : राज्यभरातील कंत्राटी आरोग्य कर्मचारी 24 डिसेंबर पासून राज्यभर आंदोलन करत आहेत. या आंदोलनात अमरावती जिल्ह्यातील एकूण साडेतेराशे कंत्राटी आरोग्य कर्मचारी सहभागी झाले आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शहरी ग्रामीण आणि एनयूएचएम अंतर्गत कार्यरत तसंच एनएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांना वयाची अट शिथिल करून नियमित रिक्त पदावर समायोजन करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा. यासह तांत्रिक, अतांत्रिक पदावर कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांची सेवा प्रवेश नियम त्वरित तयार करून तत्काळ सेवा समायोजन करण्यात यावा. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचे सेवा समायोजन होईपर्यंत 'समान काम समान वेतन' धोरण लागू करण्यात यावे. एनएचएम अंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी कर्मचारी यांना इएसआयची योजना लागू व्हावी. अशा विविध मागण्या देखील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीनं करण्यात आल्या आहेत.
दिवाळी रस्त्यावरच केली साजरी :कोरोना काळात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनात दिवाळीच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर बसूनच दिवाळी साजरी केली. शासनाने राज्यातील गोरगरीब जनतेच्या आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला त्वरित शासन सेवेत रुजू करून घेण्याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी देखील संपावर असणाऱ्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा -
- Mothers Day 2023: मेळघाटात मातामृत्यू आणि बालमृत्यू रोखण्यासाठी राबवला जात आहे 'हा' अभिनव उपक्रम
- पालघर : कुपोषण, बालमृत्यू कमी करण्यासाठी आरोग्य सेवेने पुढाकार घ्यावा - जिल्हाधिकारी
- Nandurbar Child Death: नंदुरबार जिल्हा रुग्णालयात 179 बालमृत्यू, रिक्त पदांमुळे बालकांचा व गरोदर मातांचा मृत्यू - आमदार आमश्या पाडवी