अमरावती -तिवसा तालुक्यातील अनकवाडी व शेंदोळा खुर्द परिसरात दोन अजगरांना पकडण्यात सर्पमित्राला यश आले. दोन्ही अजगरांची लांबी 10 फूट आहे. यातील एका जखमी एका अजगरावर मोझरी येथे उपचार करण्यात आले.
अमरावतीच्या अनकवाडी व शेंदोळा शिवारात आढळले दोन अजगर; जखमी अजगराला सर्पमित्राने दिले जीवनदान - अनकवाडी अजगर न्यूज
अनेक ठिकाणी साप किंवा अजगरासारखे प्राणी आढळले की, भीतीपोटी त्यांना मारून टाकले जाते. तर काही ठिकणी सर्पमित्रच सापांची तस्करी करतात. मात्र, अमरावतीतील दोन गावांमध्ये एका सर्पमित्राने दोन अजगरांना जीवदान दिले.
तिवसा तालुक्यातील अनकवाडी येथील प्रशांत साबळे यांनी शेतात सोयाबीनची गंजी लावून ठेवली होती. ती काढत असताना त्यामध्ये अजगर असल्याचे मजुरांना आढळले. त्यांनी तत्काळ सर्पमित्र शुभम विघे यांना मदतीला बोलवले. विघे यांनी त्या अजगराला पकडले. दुसऱ्या एका घटनेत शेंदोला खुर्द येथील नरेश ठाकूर यांच्या शेतालगतच्या पांदण रस्त्याने जाणाऱ्या मजुरांना 10 फूट लांबीचा अजगर दिसला. याची माहिती मिळताच सर्पमित्र शुभम विघे यांनी सहकारी प्रविण चाके, भूषण हरणे यांच्या मदतीने या अजगराला पकडले. मात्र, त्या अजगराच्या शरीरावर जखमा झाल्या होत्या. सर्पमित्रांनी अजगराला मोझरी येथील पशुचिकित्सालय दाखल केले. डॉ. भितकर यांनी या अजगरावर उपचार केले.
हिवाळ्यात अजगर सापडण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आता अजगर हळूहळू बाहेर पडत आहेत. दोन्ही अजगरांना अगोदर वन विभागात दाखल करून नंतर नैसर्गिक अधिवासात सोडणार असल्याची माहिती सर्पमित्र शुभम विघे यांनी दिली.