अमरावती- जिल्ह्यातील वलगाव येथील संताजीनगर परिसरात महेंद्र भटकर यांच्या घरासमोर भुयार आढळून आले. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच हा प्रकार नेमका काय आहे? याची माहिती जाणून घेण्यास नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच यामुळे घराला धोका तर निर्माण होणार नाही ना, अशी भिती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
अमरावतीत आढळले भुयार; घरांना धोका निर्माण होण्याची भिती - वलगाव येथील संताजी नगर
वलगाव येथील संताजी नगर येथे महेंद्र भटकर यांच्या घरासमोर पेव्हर ब्लॉक्स लावून दोन वर्षांपूर्वी रस्ता तयार करण्यात आला. आता मुसळधार पाऊस कोसळत असल्याने घरासमोर लावलेले सदाफुलीचे झाड अचानक खाली खड्ड्यात गेले. त्यामुळे त्यांनी परिसराची पाहणी केली असता भुयार असल्याचे आढळून आले.
वलगाव येथील संताजी नगर येथे महेंद्र भटकर यांच्या घरासमोर पेव्हर ब्लॉक्स लावून दोन वर्षांपूर्वी रस्ता तयार करण्यात आला. आता मुसळधार पाऊस कोसळत असल्याने घरासमोर लावलेले सदाफुलीचे झाड अचानक खाली खड्ड्यात गेले. त्यामुळे महेंद्र भटकर यांनी खड्डा नेमका कसा पडला? याची पाहणी केली. त्यावेळी जमिनीत अतिशय खोलवर हा खड्डा असल्याचे आढळून आले. यानंतर वलगावचे माजी सरपंच प्रशांत शिरभाते यांनी खड्ड्यात डोकावून पाहिल्यावर खाली दोन दिशेला भुयारी मार्ग असल्याचे त्यांना लक्षात आले.
संजय पणबुडे हा व्यक्ती या खड्ड्यात उतरला तेव्हा जमिनीखाली दोन्ही दिशेने बऱ्याच लांब पर्यंत भुयारी मार्ग असल्याचे आढळून आले. रस्त्याखालची जमीन पूर्णतः खचली असल्याने भटकर यांच्या दोन मजली घरला धोका निर्माण झाला आहे. याबाबत सरपंच, ग्रामसेवक आणि सचिवांना नागरिकांनी महिती दिली. मात्र, त्यांनी या गंभीर प्रकारची दखल घेतली नाही. प्रशासनाने या गंभीर प्रकाराची त्वरित दखल घ्यावी. तसेच परिसरातील रहिवाशांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करावी, अशी मागणी केली जात आहे. जमिनीखाली भुयारी मार्ग नेमका कुठे निघतो? या भुयारी मार्गामुळे परिसरातील घरांना धोका निर्माण होईल का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.