अमरावती- जिल्ह्यातील यावली शहीद गावात आज मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या अभूतपूर्व सोहळ्याला ग्रामस्थांसह हजारो भक्तांनी उपस्थिती लावली होती.
हजारो भक्तांच्या साक्षीने पार पडला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा - अमरावती
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा यावली शहीद गावात मोठ्या उत्साहात पार पडला.
पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास या जन्मोत्सव सोहळ्याला सुरुवात झाली. कार्यक्रमापूर्वी गावातील गल्लीची स्वच्छता करण्यात आली. यावेळी प्रत्येक घराच्या उंबरठ्यावर प्रकाश देणाऱ्या पणत्यांनी संपूर्ण यावली गाव न्हाऊन निघाले होते. तसेच गावातील प्रत्येक उंबरठ्यासमोर काढलेली रांगोळी लक्ष वेधून घेत होती. यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहलेली भजनांचे गायन करण्यात येत असल्याने ग्रामस्थ व गुरुदेव भक्तांना मंत्रमुग्ध झाले होते. जन्मोत्सवानंतर सामुदायिक ध्यान व आरती करण्यात आली. त्यानंतर गावातून पालखीची मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी पालखीच्या स्वागतासाठी गावात ठिकठिकाणी संदेश देणारे देखावे सादर करण्यात आले होते. या सोहळ्याला महाराष्ट्रातून हजारो भक्तांनी हजेरी लावली होती.