अमरावती - गावोगावी भजन-कीर्तन करून आपल्या झाडूने स्वतः गाव स्वच्छ करून स्वच्छतेचा मूलमंत्र देणाऱ्या संत गाडगेबाबा यांच्या ६३ व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या पुण्यतिथी महोत्सवानिमित्ताने अमरावती येथील लिगल स्क्वेअर मल्टिपर्पज असोसिएशनच्या वतीने अमरावती, भातकुली व दर्यापूर या तालुक्यातील १५ वेगवेगळ्या गावातल्या १५ शाळेमधील २०० विद्यार्थ्यांच्या सहाय्याने कर्मयोगी श्री. संत गाडगेबाबांच्या कार्यांना उजाळा देत पथनाट्य सादर करून आगळे वेगळे अभिवादन करण्यात आले. तसेच जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले.
'लिगल स्क्वेअर मल्टिपर्पज असोसिएशन' गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक श्रेत्रात जनजागृती तसेच विविध शिबिराच्या माध्यमातून कार्य करत आहे. हे असोसिएशन कायदे, आरोग्य, शैक्षणिक या महत्वाच्या विषयांवर जनजागृती करत आलेली आहे. याच कार्याला पुढे नेत गाडगे बाबा यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्याच शैलीमधे जनजागृती करण्याचा संकल्प पुर्ण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यासाठी लिगल स्क्वेअर तर्फे तिन्ही तालुक्यातील १५ शाळेतील विद्यार्थ्यांना आधी पथनाट्य संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. यानंतर सर्व ठिकाणी एकाच वेळी पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.