अमरावती :मेळघाटातील आदिवासी संस्कृतीमध्येराखी पौर्णिमेप्रमाणेच श्रावण महिन्यात 'जिरोती' या सणाला खास महत्त्व आहे. मेळघाटातील कोरकू जमातीचे लोक श्रावण महिन्यातील पौर्णिमेला जिरोती हा सण साजरा करतात. या सणानिमित्त भाऊ हा सासरी असणाऱ्या बहिणीला माहेरी घेऊन येतो. गावात अनेक ठिकाणी झोके बांधले जातात. झोक्यावर झुलत भाऊ बहिणीच्या प्रेमाची गाणी म्हटली जाते. या गाण्यांना 'डोलार' असे म्हटले जाते. जिरोती या सणानिमित्त केले जाणारे नृत्य 'डोलार नृत्य' म्हणून ओळखले जाते.
मेळघाटातील समृद्ध नृत्य प्रकार :मेळघाटातील आदिवासी संस्कृतीप्रमाणेच त्यांच्या नृत्यांचा प्रकार देखील असाच समृद्ध आहे. त्यांचे नृत्याचे विविध प्रकार नागरी आणि ग्रामीण समाजापेक्षा अधिक विपुल असल्याची माहिती मेळघाट संस्कृतीचे अभ्यासक प्राचार्य डॉ. एकनाथ तट्टे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. वर्षा ऋतूच्या प्रारंभी मेळघाटात जे लोकनृत्य सुरू होतात, त्यात प्रामुख्याने महिला आणि लहान मुलींचा डोलार उत्सव आहे. त्यानंतर जिरोतीला गदली सुसून या नृत्य प्रकाराला खास महत्त्व आहे. त्यानंतर खंब नृत्य हा दुर्मिळ नाट्यप्रकार मेळघाटात आहे. यासोबतच चाचरी, दंडा हे नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे. कोणताही सण, उत्सव किंवा कुठलाही आनंदाच्या प्रसंगावेळी आदिवासी नृत्यांना मेळघाटात उधाण येते. आदिवासींच्या मनामध्ये निरागसता असल्यामुळे त्यांच्या नृत्यातून देखील निरागसपणा झळकतो, असे प्राचार्य डॉ. एकनाथ तट्टे म्हणाले.
आदिवासी संस्कृतीत नृत्याला विशेष महत्त्व :अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हे संपूर्ण महाराष्ट्रात औषधी वनस्पतींसाठी प्रसिद्ध आहे. तसेच मेळघाटातील आदिवासी संस्कृतीमधील नृत्य ही खूप प्रसिद्ध आहेत. आपल्याच संस्कृतीची अभिव्यक्ती आहे. त्यामध्ये गदली सुसून, डोलार, चाचरी, दांड्यार हे नृत्यप्रकार संपूर्ण जनमानसाची अभिव्यक्तीच आपल्यासमोर मांडतात, असे आदिवासी संस्कृतीचे अभ्यासक सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. पृथ्वीसिंह राजपूत ई' टीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले. मेळघाटची संस्कृती वेगळ्या पद्धतीने जगासमोर मांडण्यासाठी आदिवासी बांधवांचे नृत्य खूप बोलके ठरते, असे देखील डॉ. पृथ्वीसिंह राजपूत म्हणाले.
'या' सणांना आदिवासी नृत्यांना उधाण :श्रावण महिन्यात मेळघाटातील अनेक गावात आदिवासी बांधव नृत्य करतात. आदिवासी परंपरेत होळी सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो. या सणाला आदिवासींच्या नृत्याला खास उधाण येते. हातात काठ्या घेऊन ढोलकीच्या तालावर आदिवासी बांधव बेभान होऊन नाचतात. होळीच्या पर्वावर नृत्य सादर करताना देवांची तसेच सुंदर स्त्रियांचे वर्णन असलेली गाणी गायली जातात. दसऱ्याच्या पर्वावर रावण, मेघनाथ यांची पूजा मेळघाटातील आदिवासी बांधव मोठ्या थाटात करतात. यावेळी देखील नृत्याद्वारे आदिवासी बांधव आनंद साजरा करतात. एकूणच सर्वच धार्मिक विधी, सण उत्सव आणि आनंद असे आदिवासींचे सारे काही नृत्यामधून व्यक्त होते.
हेही वाचा :
- International Day Of Worlds Indigenous People 2023 : जागतिक आदिवासी दिन का करण्यात येतो साजरा? काय आहे महत्व आणि इतिहास
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आदिवासी नृत्यात ठेका धरतात तेव्हा...
- Video राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सव ,राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सवाचे झाले उद्घाटन, पहा महाराष्ट्रचे कलाकार