महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 3, 2021, 7:31 PM IST

ETV Bharat / state

वृक्षप्रेमींनी केली वृक्षावर शस्त्रक्रिया; बुडापासून तोडलेले झाड पुन्हा केले उभे

भर उन्हात सावली देणारे झाड एका समाजकंटकाने तोडले. त्या समाजकंटकला कायद्यानुसार दंड, शिक्षा होईल. मात्र, बुडापासून तुटलेल्या झाडाचे काय? असा प्रश्न निर्माण झाला असताना वृक्षप्रेमींनी गार्डन क्लब सदस्यांच्या मदतीने तुटलेल्या झाडावर दोन तास शस्त्रक्रिया केली आणि झाडाला जीवनदान देण्याचे प्रयत्न केले.

tree lovers Garden Club Tree Surgery
वृक्षप्रेमी गार्डन क्लब वृक्ष शस्त्रक्रिया

अमरावती -भर उन्हात सावली देणारे झाड एका समाजकंटकाने तोडले. त्या समाजकंटकला कायद्यानुसार दंड, शिक्षा होईल. मात्र, बुडापासून तुटलेल्या झाडाचे काय? असा प्रश्न निर्माण झाला असताना वृक्षप्रेमींनी गार्डन क्लब सदस्यांच्या मदतीने तुटलेल्या झाडावर दोन तास शस्त्रक्रिया केली आणि झाडाला जीवनदान देण्याचे प्रयत्न केले. अमरावती शहरातील कठोरा नाका ते पोटे इस्टेट मार्गावर सदाहरित सप्तपर्णी या वृक्षाला जीवनदान देण्यासाठी आज सकाळी वृक्षप्रेमी धावून आलेत.

माहिती देताना अमरावती गार्डन क्लबचे पदाधिकारी

हेही वाचा -मेळघाटात भोंदूबाबाने दिले तीन वर्षीय मुलाच्या पोटाला चटके; बालकाची प्रकृती चिंताजनक

कठोरा मार्गरवर वृक्ष पालकत्व अभियान

शहरातील सर्वात सुंदर मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कठोरा नाका ते पोटे इस्टेट पर्यंत प्राणवायू देणाऱ्या विविध वृक्षांची लागवड करण्यासाठी कठोरा नाका परिसरातील शेकडो नागरिक 'वृक्ष पालकत्व अभियान' अंतर्गत गत तीन ते चार वर्षांपासून वृक्ष लागवड अभियान राबवत आहे. भर उन्हातही परिसरातील नागरिक वृक्ष लागवड आणि वृक्ष जगविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यामुळे या मार्गावर पिंपळ, कडुनिंब, सदाहरित सातपर्णी अशा विविध वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

कुऱ्हाडीने कापले सदाहरित सप्तपरणीचे वृक्ष

कठोरा मार्गावर असणाऱ्या एका दुकानासमोर 4 वर्ष वयाचे सदाहरित सप्तपर्णीचे झाड होते. सावली आणि गारवा देणारे हे झाड दुकानाच्या मालकाने आपल्या नौकरांकडून कुऱ्हाडीने घाव मारून बुडापासून तोडले. या प्रकारामुळे परिसरातील वृक्षप्रेमी चिडले.

वृक्ष वाचविण्यासाठी ऑपरेशन रिव्हायव्हल

वृक्षप्रेमी धावून येताच वृक्ष तोडणाऱ्यांनी पळ काढला. संपूर्ण झाड तोडले असताना झाडाचा अगदी थोडा भाग जुळलेला होता. या वृक्षाला वाचविण्यासाठी अमरावती गार्डन क्लबचे पदाधिकारी डॉ. दिनेश खेडकर यांनी आपल्या सहकारी तज्ज्ञांसह वृक्ष वाचविण्यासाठी ऑपरेशन रिव्हायव्हल राबविले. या प्रयोगात त्या तुटलेल्या वृक्षाच्या फांद्या कापून तुटलेला भाग जोडण्यासाठी वापरण्यात आला. मॉसचे आवरण करण्यात आले. हॉर्मोन्सची ट्रिटमेंट करण्यात आली. तुळशीच्या पानांचा रस वृक्षाच्या बुडाशी टाकण्यात आला. आमचा हा प्रयोग नक्कीच यशस्वी होईल. महिनाभरानंतर या प्रयोगाचा रिझल्ट कळेल, असे डॉ. दिनेश खेडकर यांनी 'ईटीव्ही भारत' ला सांगितले.

वृक्ष कापणाऱ्यांना अद्दल घडविणारा कायदा हवा

आज कोरोना काळात ऑक्सिजन किती महत्वाचे आहे, हे सगळ्यांना कळले आहे. ऑक्सिजन देणारी अशी अनेक वृक्ष कठोरा मार्गावर लावण्यात आली आहे. ज्या दुकानांसमोर सदाहरित सप्तपर्णीचे झाड होते, त्या दुकानदाराने हे झाड कारण नसताना तोडून टाकले. आता त्याच्यावर कारवाई होणार आहे, मात्र वृक्षतोड करणाऱ्यांना अद्दल घडावी अशा कायद्याची गरज आल्याचे डॉ. दिनेश खेडकर म्हणाले.

वृक्षाला जीवनदान देण्यासाठी यांनी केले प्रयत्न

सदाहरित सप्तपर्णीला जीवनदान देण्यासाठी डॉ. दिनेश खेडकर यांच्यासह सुभाष भावे, डॉ. गणेश हेडवू, डॉ. उमेश कान्हेरकर, डॉ. सुचिता खोडके, मिलिंद तटे, दिलीप नंदगावळी, मंगेश अडगोकर, रामेश्वर चरपे, क्षिप्रा मानकर, निलिमा विखे, सुरेश राऊत यांनी प्रयत्न केले.

हेही वाचा -राज्य सरकारच्या कृषी विभागाची विमा कंपन्यासोबत हात मिळवणी - डॉ. अनिल बोंडे

ABOUT THE AUTHOR

...view details