अमरावती: सर्वसामान्यप्रमाणे कॅलेंडरवर दर्शविलेल्या तारखेला सर्वत्र होळी साजरी केली जाते. मेघाटात मात्र प्रत्येक गावात वेगवेगळ्या दिवशी होळी साजरी केली जात असल्याची माहिती चिखलदरा येथील रहिवासी गणेश जामूनकर यांनी सांगितले. गावातील प्रमुख होळी कोणत्या दिवशी साजरी करायची हे ठरवतो असे ग्रामस्थांनी सांगतिले. आपल्या गावच्या होळीमध्ये लगतच्या गावातील रहिवासी तसेच सर्वांचे नातेवाईक सहभागी व्हावेत, या उद्देशाने प्रत्येक गावात वेगवेगळ्या दिवशी होळीचा सण साजरा करण्याची प्रथा असल्याचे गणेश जामूनकर यांनी सांगितले.
होळीनिमित्त भरतो बाजार: होळी निमित्ताने पंधरा दिवसापासूनच प्रत्येक घरात तयारीला सुरुवात होते. घर शेणाने सारवणे तसेच घराला रंगरंगोटी केली जाते. रोजगारानिमित्त बाहेर असणारे पुरुष मंडळी होळीला आपल्या रोजगारातून मिळालेला पैसा घेऊन घरी परत येतात. होळीनिमित्त बाजार भरतो. या बाजारात सात आठ गावातील कुटुंब होळीनिमित्त खरेदी करण्यासाठी येतात. होळीनिमित्त लागणाऱ्या वस्तू तसेच नवीन कपडे आणि मुलांसाठी खेळणी या बाजारातून खरेदी केल्या जाते.
दोन दिवस पेटवली जाते होळी: सर्वसामान्यप्रमाणे होळीच्या दिवशी होळी पेटवली जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. मेळघाटात मात्र होळीच्या दिवशी प्रत्येक घरी होळी पेटवली जाते. दुसऱ्या दिवशी गावातील सर्व कुटुंबाची एक सार्वजनिक होळी पेटवण्याची प्रथा आहे. पहिल्या दिवशी प्रत्येकाच्या घरी होळी पेटते त्या दिवशी पुरी, भाजी, शिरा, भजे असा स्वयंपाक प्रत्येकाच्या घरी केला जातो. पहिल्या दिवशी होळीनिमित्त केलेला स्वयंपाक दुसऱ्या दिवशी पहाटे घराबाहेर ठेवला जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील युवक पुरुष मंडळी प्रत्येकाच्या घरासमोर ठेवलेले ताटातील जेवण शिदोरीत बांधून जंगलात लाकडे तोडण्यासाठी जातात. जंगलातून लाकडे तोडून आणल्यावर गावातील मुख्य चौकात होळी रचली जाते. सायंकाळी सार्वजनिकरित्या होळी पेटविण्यात येते. यावेळी गावातील लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व एकत्रित येतात. या दिवशी प्रत्येकाच्या घरी मटन, मासोळीचे जेवण शिजते. होळीच्या निमित्ताने रात्रभर आदिवासी बांधव नृत्य सादर करून आनंद लुटतात अशी माहिती, जयतादेही येथील रहिवासी रमेश बेठे यांनी दिली.