अमरावती- एका बँकेतून दुसऱ्या बँकेत सहजरित्या पैसे पाठविता यावे, यासाठी नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर (एनईएफटी) ही पैशांच्या इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफरची पद्धत सुरू केली. मात्र, ही प्रणाली ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील महाराष्ट्र बँकेतून एचडीएफसी बँकेच्या खात्यामध्ये पाठविलेले 99 हजार 900 रूपये तब्बल 23 दिवसांपासून अडकून पडले असल्यामुळे ग्राहकाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत मनोज शिंदे यांचे गिताई इलेक्ट्रीकल्स या फर्मच्या नावाने खाते आहे. त्यांनी या खात्यामधून 13 डिसेंबर रोजी अमरावती येथील एचडीएफसी बँकेत हीना मार्केंटींग नावाच्या खात्यात एनईएफटी प्रणालीव्दारे 99 हजार 900 रुपये ट्रान्सफर केले. मात्र, अनावधाने त्यांच्याकडून खाते क्रमांकाचा एक आकडा कमी लिहिण्यात आला होता. यामुळे त्यांच्या खात्यामधून कमी झालेली ही रक्कम दुसऱ्यांच्या खात्यावर पोहचली नाही. त्यामुळे ती रक्कम त्याचदिवशी मनोज शिंदे यांच्या गिताई ईलेक्ट्रीकल्स नावाच्या खात्यावर परत येणे आवश्यक होते. परंतु, तसे झाले नाही. त्यांनी वारंवार महाराष्ट्र बँकेत चकरा मारल्या, अमरावती एचडीएफसीमध्येही गेले. परंतु, काहीही उपयोग झाला नाही. 23 दिवसांपासून नेमके पैसे गेले कुठे हे सुध्दा बँकेला माहिती नाही. अशामुळे ग्राहक या प्रणालीमुळे वैतागला असून पैसे परत कधी येणार याची वाट बघत आहे.