अमरावती - शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सोमवारी नवीन पाच बाधितांची नोंद करण्यात आली. याबरोबरच जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 700 वर पोहोचली आहे. मागील 15 दिवसांपासून कोरोनाग्रस्तांची सरासरी संख्या दररोज 20 ने वाढत आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या वाढत असतानाही कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन हवे तितके गंभीर असल्याचे दिसत नाही आहे. तर नागरिकही बिनधास्तपणे सर्रास नियमांचे उल्लंघन करत बाहेर गर्दी करत आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण 3 एप्रिलला आढळून आला होता. यानंतर तीन महिन्यात ही संख्या 700 वर पोहोचली. अमरावती शहरातील हतीपुरा, नागपुरी गेट, अलमस नगर, हबीब नगर, नूर नगर, छाया नगर, मासानगंज, बडनेरा, कंवरनगर, विलास नगर, महेंद्र कॉलनी, वडाळी, शेगाव नाका, रुक्मिणी नगर, साईनगर, आकोली, राहाटगाव, अंबागेट, जवाहर गेट, साबणपुरा, राजकमल चौक, गांधी चौक, राजापेठ, राठी नगर, दस्तुरनागर, यशोदानगर, फ्रेझरपुरा, अशोकनगर, पन्नालाल नगर, प्रभा कॉलनी, अंबा विहार, शारदा विहार, रामपूर कॅम्प, सिंधू नगर, शंकर नगर, तपोवन, राज्य राखीव पोलीस दल वसाहत, राहुल नगर, चपराशीपुरा अशा शहरातील जवळपास सर्वच भागात कोरोनाबाधित आढळले आहेत.