अमरावती -अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मंगळवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत 82.91 टक्के मतदान झाले असून सर्व 77 मतदान केंद्रांवर मतदारांचा उत्साह दिसत होता.
पोलिसांचा होता तगडा बंदोबस्त - अमरावती शहरातील पाच पैकी 3 मतदान केंद्र गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, एक मतदान केंद्र शहर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक आणि फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक असे पाच मतदान केंद्र होते. या सर्व मतदान केंद्रावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.शुक्रवारी लागणार निकाल -निवडणूक रिंगणात असणाऱ्या 27 उमेद्वारांपैकी कोण बाजी मारणार याचा निकाल शुक्रवारी लागणार आहे. अमरावती शहरातील कॉटन मार्केट परिसरातील शासकीय गोदामात मतमोजणी होणार आहे.मतदाना उमेदवारांनी केला जल्लोष -अमरावती शहरातील गर्ल्स हायस्कूल चौक येथे भाजप, महाविकास आघाडी या राजकीय पक्षांच्या उमेद्वारांसह सर्व अपक्ष उमेदवारांचे पोलींग बुथवर दिवसभर गर्दी होती. सायंकाळी 5 वाजता मतदान प्रक्रिया आटोपल्यावर काही अपक्ष नवख्या उमेदवारांनी जल्लोष केला.प्रत्येकाला विजयाची आशा -मतदान प्रक्रिया पार पडल्यावर कोण बाजी मारणार याबाबत अंदाज लावले जात असताना प्रत्येक उमेदवाराला आपण विजयी होऊ, अशी आशा आहे. आपल्या हक्काच्या मतदारांनी आपल्याला पहिल्या पसंतीचे मत दिले असतील आणि दुसऱ्या पसंतीचे अनेक मते आपल्याला पडतील आणि आपला विजय नक्की होईल, असे ठोकताळे लावत अनेकांना आपला विजय होणार, अशी आशा आहे.
जिल्हानिहाय मतदान टक्केवारी -
अमरावती - 81.01
अकोला - 82.50
वाशिम - 86.94
बुलडाणा - 81.33
यवतमाळ - 85.43
एकूण - 82.91