अमरावती- शुक्रवारी सायंकाळी आलेल्या मुसळधार पावसाने पर्थोट गावाला जलाशयाचे स्वरुप प्राप्त झाले होते. पावसाचे पाणी घरात घुसल्यामुळे नागरिकांनी वर्षभरासाठी साठवलेले धान्यही वाहून गेले आहे. गावालगतच्या नाल्याला पूर आल्याने एका शेतकऱ्याची ७५ हजार रुपयांची बैलजोडी ही वाहून गेली आहे.
पथ्रोट गावात शुक्रवारी सायंकाळी चार वाजता पासून सहा वाजेपर्यंत मुसळधार पाऊस झाला. या दरम्यान, गावातील शंभरच्यावर लोकांच्या घरात पावसाचे पाणी घुसून घरातील अन्नधान्य, दैनंदिन गरजेच्या वस्तु पुराच्या पाण्यात बुडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहे. पथ्रोट गावातून अंजनगाव सुर्जीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बांधलेल्या पुलाचे भगदाळ बुजल्याने व त्यात शुक्रवारी सायंकाळी आलेल्या मुसळधार पावसाने गावाला जलाशयाचे स्वरुप प्राप्त झाले होते.