अमरावती - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती बडनेराचे आमदार रवी राणा सध्या तुरुंगवासात आहेत. अमरावतीतील शंकरनगर येथील त्यांच्या निवासस्थानासमोर बुधवारी रात्री अकराशे दिव्यांनी रोशनाई करण्यात आली. तसेच 'सुंदर कांड'चे आयोजन करण्यात आले. आमदार रवी राणा यांचा बुधवारी वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आपला नेता कारागृहात असतानाही आगळा-वेगळा असा संदेश देण्याच्या उद्देशाने हे संपूर्ण आयोजन करण्यात आले आहे. रवी राणा यांची मुलगी नंदिनी आणि मुलगा राजवीर यांनी आपल्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त घरासमोर दिव्यांची आरास लावण्यात कार्यकर्त्यांना मदत केली आहे.
राणा दाम्पत्य कारागृहात -राणा यांच्या अमरावतीच्या घरासमोर मंगळवारी रात्री आनंददायी वातावरण असताना खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दोघेही सध्या कारागृहात आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबई येथील मातोश्री या निवासस्थानी दत्त शनिवारी हनुमान चालीसा पठणासाठी मुंबईत पोहोचलेल्या राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर दोघांनाही न्यायालयात हजर केले असता राजद्रोहाच्या गुन्ह्यांमध्ये दोघांनाही 14 दिवसांचा तुरुंगवास सुनावण्यात आला.