अमरावती -अमरावती जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाने कहर केला आहे. सोमवारी जिल्ह्यात 449 नवे कोरोनाबाधित समोर आले असून, जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 25 हजार 743 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे सोमवारी जिल्ह्यात 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण अमरावतीत आढळला होता. त्यानंतर सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत होती. नोव्हेंबर महिन्यापासून कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होऊन, शहर आणि जिल्ह्यात सर्वकाही सुरू झाले असताना, फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ व्हायला लागली आहे. 5 फेब्रुवारीला जिल्ह्यात 381 ऍक्टिव्ह रुग्ण होते. 6 फेब्रुवारीला त्यात 199 रुग्णांची नव्याने भर पडली. 7 फेब्रुवारीला जिल्ह्यात 463 ऍक्टिव्ह रुग्ण झाले, 8 फेब्रुवारीला कोरोना रुग्णांचा आकडा 608 वर पोहोचला 9 फेब्रुवारीला त्यात 86 रुग्णांची भर पडली. 10 फेब्रुवारीला तब्बल 359 कोरोनाचे रुग्ण आढळून आले, तर 12 फेब्रुवारीला 369 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. 13 फेब्रुवारीला कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 1083 वर पोहोचला होता. तर 14 फेब्रुवारीला 399 जणांना कोरोनाची लागण झाली. सोमवारी 15 फेब्रुवारीला तब्बल 449 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 439 जणांचा मृत्यू झाला आहे.
पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आल्यास कारवाई
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी शौलेश नवाल यांनी पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र जमल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. गृह विलगिकरणाचे नियम मोडणाऱ्यांवरही कठोर कारवीचे आदेश देण्यात आले आहेत.