अमरावती -देशासह राज्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. शहरात आज (गुरुवार) 14 नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. त्यामुळे अमरावतीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 304 झाली आहे.
अमरावतीतील अकोली परिसरात आज पहिल्यांदाच कोरोनाचे 2 रुग्ण आढळून आले असून, यामध्ये 42 वर्षीय पुरुष आणि 36 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जुनी वस्ती बडनेरा येथे 40 वर्षीय महिलेसह एका 18 वर्षाच्या युवकाला कोरोना असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. जमील कॉलनी परिसरात 55 वर्षाच्या पुरुषाला कोरोना झाला असून, साबणपुरा परिसरात 18 वर्षाचा युवक कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमरावतीच्या दस्तुरनगर परिसरात असणाऱ्या दत्त कॉलनी येथील 37 वर्षीय महिलेसह 37 वर्षाच्या पुरुषाला कोरोना झाला आहे.
अमरावतीत आज नवीन 14 कोरोनाग्रस्तांची नोंद, एकूण संख्या 304 - अमरावती कोरोना अपडेट
अमरावतीत आज (गुरुवार) 14 नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. त्यामुळे अमरावतीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 304 झाली आहे.
जलारामनगर प्रभा कॉलनी येथे 10 वर्षाच्या बालकासह एक 30 वर्षाची महिला आणि 38 वर्षाच्या पुरुषाला कोरोना झाला आहे. राज्य राखीव पोलीस दल वसाहतीत राहणाऱ्या 36 वर्षाच्या पोलिसालाही कोरोना झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. परतवाडा शहरातील सदर बाजार परिसरात 63 वर्षाच्या पुरुषाला कोरोनाची लागण झाली असून, परतवाडा येथील डॉ. पिंपळकर मार्ग या भागात राहणाऱ्या 42 वर्षीय महिलेलाही कोराना झाला आहे.
आज दिवसभरात अमरावती शहरातील 12 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, परतवाडा शहरातील दोघांना कोरोना झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील बाजारपेठ सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खुली करण्यात आली असून, शहरात दिवसभर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे. शहरात वाढलेली गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी कुठलीही उपाययोजना नसल्यामुळे आणि कोणता व्यक्ती नेमका कोणत्या भागातून येतो आहे याची माहिती नसल्यामुळे कोरोनाचा प्रसार अमरावती शहरात आणखी झपाट्याने वाढण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.