अमरावती -शिवसेनेच्या तिवसा शहर प्रमुख अमोल पाटील (वय 34) यांची अज्ञातांनी डोळ्यात मिरचीपूड टाकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना येथील अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तिवसा शहरातील आशिर्वाद वाईन बारसमोर रात्री 10.30 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
अज्ञातांनी केले सपासप वार -
अमोल पाटील हा त्याच्या मित्रासोबत बारमध्ये आला होता. अमोल पाटील व त्याचा एक मित्र बार बंद झाल्याने बार समोर बसला होता. दरम्यान, काही वेळात याठिकाणी 2 ते 3 अज्ञात आरोपींनी अमोल पाटील याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याची जागीच हत्या केली. घटनेची माहिती मिळताच, लागलीच तिवसा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक रिता उईके यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. तर यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होती. मात्र, अद्यापही आरोपीचा शोध लागला नाही.