अमरावती -चांदूर रेल्वे येथील महिला कला, वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींना प्राध्यापकांनी प्रेम व प्रेमविवाह न करण्याची शपथ दिली होती. १३ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन-डेच्या पूर्वसंध्येस राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबीरात टेंभूर्णी येथे हा प्रकार घडला होता. या प्रकारानंतर अनेक महिला लोकप्रतिनिधींनी यावर आक्षेप नोंदवला होता.
चौकशी अहवाल आल्यानंतर आता संबंधित तीन शिक्षकांचे निलंबन झाले आहे. यानंतर प्रशासनाने संबंधित प्राचार्यांना स्पष्टीकरण मागितले होते. याचा चौकशी अहवाल आल्यानंतर आता संबंधित तीन शिक्षकांचे निलंबन झाले आहे. प्राचार्यांच्या निलंबनानंतर महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी प्राध्यापकांचे निलंबन रद्द करण्यासाठी ठिय्या दिला आहे.
या शपथ प्रकरणानंतर विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीने प्राचार्यांसह दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. याचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर सोसायटीने एका समितीमार्फत चौकशी सुरू केली. आज या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्राचार्य डॉ. राजेंद्र हावरे, प्रा. प्रदीप दंदे व रासेयो कार्यक्रम अधिकारी कापसे यांना निलंबीत करण्यात आले आहे. तसेच प्राचार्य पदाचा पदभार डॉ.सिमा जगताप यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
या प्राध्यापकांचे निलंबन रद्द करावे, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. यासाठी सकाळपासून विद्यार्थीनींनी महाविद्यालयाला कुलूप लावून आंदोलनाला सुरुवात केली. या तीन प्राध्यापकांचे निलंबन मागे घेणार नाही, तोपर्यंत सर्व तासिकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे. त्यामुळे आता महाविद्यालयाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.