अमरावती -परतवाडा-धारणी मार्गावर भरधाव वेगात असणारी क्रूझर गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. बुधवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत, तर चौघे गंभीर जखमी आहेत. अपघातातील मृतांची आणि जखमींची नावे अद्याप समजू शकली नाहीत.
परतवाडा-धारणी मार्गावर क्रूझर झाडावर आदळली; तीन ठार, चौघे जखमी - अमरावती अपघात न्यूज
सरकारने नवीन अनलॉकची नवीन गाइडलाइन्स जाहीर केली आहे. त्यानुसार काही अटी-शर्ती ठेवून मेळघाटात पर्यटनाला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता परिसरातील तरुणांची या ठिकाणी गर्दी वाढली आहे. असेच बुधवारी सात तरुण मेळघाटातून परतत असताना त्यांचा अपघात झाला.
सध्या पावसाळ्यात मेळघाटचे निसर्ग सौंदर्य बहरले असून मेळघाटात पर्यटनासाठी गर्दी व्हायला लागली आहे. बोरगाव मंजू येथील रहिवासी असणारे 7 तरुण मेळघाटात फिरायला गेले होते. घरी परतत असताना बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांच्या क्रूझर गाडीच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी झाडावर आदळली. घटनेची माहिती मिळताच परतवाडा पोलीस अपघातस्थळी दाखल झाले.
हा अपघात इतका भीषण होता की गाडीतील तीन तरुण घटनास्थळीच ठार झाले. तसेच चार जण गंभीर झाले. यापैकी दोघांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. हे सातही तरुण 23 ते 26 वयोगटातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांची ओळख पटविण्याचे आणि त्यांच्याबाबत माहिती मिळविण्याचे काम परतवाडा पोलीस करीत आहेत.