अमरावती - जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील विवाह नोंदणी कार्यालयाच्या परिसरात सोशल डिस्टन्स, गर्दीवर नियंत्रण न ठेवणे, गर्दी कमी करण्याचा प्रयत्न न करणे, नागरिकांच्या चेहऱ्यावर मास्क नसणे अशा अनेक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अमरावतीत तीन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग-2, सहाय्यक दुय्यम निबंधक, सह वर्ग-2 व विवाह अधिकारी यांना मनपाच्या पथकाने तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शासकीय अधिकाऱ्यांवर करण्यात आलेली जिल्ह्यातली ही पहिलीच कारवाई आहे.
तीन शासकीय अधिकाऱ्यांना दंड ठोठावण्यात आला वारंवार सूचना देऊनही अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष -
विवाह नोंदणी कार्यालयातील या अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर फोनवरूनही सूचना दिल्या होत्या. तरीही त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर या तिन्ही अधिकाऱ्यांना दंड करण्यात आला. त्यामुळे केवळ सर्वसामान्यच नव्हे तर शासकीय अधिकाऱ्यांवर कोरोना प्रतिबंधक कारवाई केली जाणार आहे, याबाबत नागरिकांना खात्री पटली आहे. गृह विलीनीकरण नोडल अधिकारी व दक्षता पथकाचे प्रमुख सचिन बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली मनपा पथकाने ही कारवाई केली आहे.
विनापरवानगी लग्न सोहळा करणाऱ्यांसह सहा बारवर कारवाई -
घरी केवळ वीस जणांच्या उपस्थितीत लग्न करण्यास अनुमती असून यासाठी परवानगी घेणे अनिवार्य आहे. असे असतानाही महेंद्र कॉलनी येथील अनिल नारायण कासंडी यांनी विनापरवानगी घरी लग्न समारंभ आयोजित केल्यामुळे त्यांना वीस हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच शहरातील सहा बारमध्ये ग्राहक विनापरवाना मद्यपान करत असल्याचे आढळल्याने राज प्लाजा, गझल, राज पॅलेस, राजासाहेब, कैलास बार, बगीच्या गार्डनला प्रत्येकी आठ हजार असा एकूण 48 हजाराचा दंड ठोठावण्यात आला.