महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिवाळीपुरतं तरी घरी न्या! त्यांची काळजाच्या तुकड्याला 'आर्त' हाक - अमरावती वृद्धाश्रम न्यूज

कुलदिपकाला दिवाळीचे फटाके, फराळ, कपडे मिळावे म्हणून मी आपल्या जिवाचा आटा पिटा केला. मात्र लग्नानंतर त्याने घराबाहेर काढल्याने हजारो वृद्धांची दिवाळी वृद्धाश्रमात साजरी होणार आहे. यासाठी श्री गुरूदेव सेवा मंडळाने पुढाकार घेतला आहे.

वृद्धाश्रमातील वृद्ध

By

Published : Oct 26, 2019, 8:16 PM IST

Updated : Oct 28, 2019, 7:27 PM IST

अमरावती -आयुष्यात ज्या जन्मदात्यांनी प्रकाश आणण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी जीवन तेजोमय केले, अशा कुटुंबातील कुलदिपक या जन्मदात्यांना विसरले आहेत. आयुष्याच्या संध्याकाळी भेटीच्या रुपाने त्यांना मिणमिणती पणतीही दाखवित नाहीत. दिवाळीच्या पर्वावर आपल्याला आपले कुलदिपक घराकडे नेतील का ? अशी आशा वृद्धाश्रमातील वृद्धांना लागली आहे.

दिवाळीत घरी नेण्यासाठी काळजाच्या तुकड्याला 'आर्त' हाक

अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथील वृद्धाश्रमात राज्यभरातील वृद्ध आश्रयाला आहेत. दिवाळीच्या उत्सवाला कालपासून सुरुवात झाली आहे. यानिमित्त आपल्या मुलांनी , नातेवाईकांनी आपल्याला घरी न्यावे म्हणून वृद्धाश्रमातील वृद्ध धडपडतात. जिल्ह्यात शासनाच्या अनुदानावर मोजके वृद्धाश्रम सुरळीतपणे सुरू आहेत. समाजाचे ऋण फेडावे या हेतूने सुरू स्वखर्चाने आठ वृद्धाश्रम जिल्ह्यात आहेत. संपुर्ण आयुष्यात कुलदिपकासाठी किती कष्ट घेतले, याची बेरीज, वजाबाकी वृद्ध मांडतात. सध्याच्या युगात पैसा मुबलक असल्यामुळे नाते संबंधातील प्रेम संपले आहे. मुलं पैशाने बायकांचे प्रेम विकत घेत आहेत. मात्र, आई वडिलांचे खरे प्रेम पैशात विकत घेता येत नाही. हेच आजची पिढी विसरली आहे. या पिढीला पाहिजे ते शिक्षण, हवा तेवढा पैसा मिळत आहे. मात्र, आजची पिढी खोटी प्रतिष्ठा वंशाचे दिवे जपत आहे.

ज्यांनी तळहाताला चटके घेत त्यांना मोठे केले. आज ते आम्हाला विसरले आहे. त्यामुळे वृद्धाश्रमात आयुष्याच्या सायंकाळचे दिवे तेवत ठेवायची वेळ आणली आहे. अशा मुलांना दिपावलीच्या सायंकाळी आनंदाने दिवे लावतांना वृद्ध आई वडिलांची आठवण होणार काय ? चिमुकल्या हातांना धरुन दिपावलीचा दिवा, फटाके कसे लावायचे या गोष्टी जन्मदात्यांनी शिकविल्या त्या आई वडिलांची दिपावली वृद्धाश्रमात साजरी होत आहे. याचे काहीच वाटत नसेल काय ? दिवाळीसारख्या सणाला आपल्याला घराकडे न्यावे असे एका 65 वर्षीय वृद्धाने आपल्या नावाचा उल्लेख न करण्याचे सांगून वंशाच्या दिव्याची कथा विशद केली.

लहानपणी या कुलदिपकाला दिवाळीचे फटाके, फराळ, कपडे मिळावे म्हणून मी आपल्या जिवाचा आटा पिटा केला. आज तो मोठा झाल्यावर आम्हाला विसरला आहे. दिवाळीसारख्या सणाला आम्हाला घरी नेण्यास दरवर्षी टाळले जाते. आयुष्यातील संध्याकाळ साजरी करताना आपल्या कुटुंबाचा मुख्यत्वे मुलांचा आधार असावा लागतो. मात्र, वृद्धापकाळात आमच्या सारख्या आई-वडिलांना आश्रमाचा आधार घ्यावा लगत असल्याचे दु:ख त्यांनी व्यक्त केले.

वंशाच्या दिव्याला जन्म देताना आईला मोठ्या कळा सोसाव्या लागतात. आयुष्याचा आधार मिळेल, मृत्यूनंतर याच कुलदिपकाच्या खांद्यावर शेवटची विश्रांती यात्रा पुर्ण होईल, अशी आशा प्रत्येक आई वडिलांची असते. मात्र, लग्न झाल्याबरोबर या कुलदिपकांनी आपल्याला आश्रमाचा रस्ता दाखवला. वर्षातून केवळ दहा मिनीट आपल्याला भेटायला येते, अशी माहिती आता नातवंडांना खांद्यावर खेळवण्याऐवजी दु:खाचे अश्रु पुसत जीवन जगावे लागत असल्याची कैफियत एका वृद्ध महिलेने मांडली.

या वृद्धाआश्रमाला शासनाचे अनुदान असून या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वृद्धांची सेवा केली जाते. जन्म देऊनही पोटच्या गोळ्याने नाकारले. आई वडिलांचा सांभाळ करता येत नाही, अश्यांनी आपल्या जन्मदात्याला येथे टाकले. त्यांची दिवाळी संस्थेच्या वतीने साजरी केली जाते. खूप मन कठोर करून हे वृद्ध अखेरच्या वयात आपल्या मुला मुलींची आस धरून बसले आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्थापित केलेल्या अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील वृद्धाआश्रमात ४० पेक्षा अधिक वृद्ध आहेत. मात्र, त्यांना जन्म दिला अशा पोटच्या गोळ्याने त्यांना नाकारले. त्यामुळे अनेकांनी वृद्धाआश्रमाची वाट धरली व ते अखेरच्या घटका मोजत आहेत. मात्र, दिवाळीचा सण हा परिवारासोबत साजरा करण्याची इच्छा असते. मात्र, वृद्धाआश्रमात असलेल्या लोकांना घरची आस लागली असताना त्यांची दिवाळी यंदाही वृद्धाआश्रमात होणार आहे. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ मोझरीच्या वतीने त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली जाणार आहे.

Last Updated : Oct 28, 2019, 7:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details