अमरावती -हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर आता अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. दीपाली यांची मेळघाटात 2014 पासून 2021 पर्यंत सात वर्षांची सेवा झाली होती. आता त्यांना मेळघाटाबाहेर बदली हवी होती. हरिसाल येथून परतवाडा येथे बदली मिळावी यासाठी दीपाली चव्हाण यांनी कोणत्या मंत्र्याला पैसे दिले होते? याचा देखील तपास लागला पाहिजे अशी मागणी, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.
दीपाली चव्हाण यांच्या पतीने केला होता आरोप
दीपाली यांना मेळघाटातील सात वर्षांच्या सेवेनंतर त्यांना मेळघाटातून बदली हवी होती. यासाठी 'संबंधितांना' (बदलीसाठी पैसे घेणारी यंत्रणा) पैसेही दिले होते. मात्र, पैसे देऊनही बदली होत नसल्याने त्या खचल्या होत्या, असा दावा दीपाली यांचे पती राजेश मोहिते यांनी केला आहे.
पैसे दिल्याशिवाय बदली होतच नाही, हे काही आता लपविण्यासारखे नाही. पैसे दिल्यावरही बदली होत नसल्याने आम्ही पैसे परत मागितले होते. मात्र, तेही परत करण्यात आले नसल्याचे राजेश मोहिते यांनी स्पष्ट केले आहे.