अमरावती -आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजमधून महाजनादेश यात्रेला सुरूवात केली. या यात्रेच्या पहिल्याच दिवशी मोझरीत गर्दीची संधी पाहून काही चोरट्यांनी हातसफाई केल्याची माहिती समोर आली आहे. मोबाईल, पाकीट चोरट्यांचा सुळसुळाट यात्रेदरम्यान समोर आला आहे. या यात्रेसाठी नागपूर येथून आलेले चंदनगिरी गोस्वामी यांचा 14 हजारांचा मोबाईल, अमरावती येथील देवेंद्र खडसे यांचा 10 हजारांचा मोबाईल, तर वैभव ठाकरे व सुनील भारती यांच्या खिशातील पाकीट असा एकूण चोवीस हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत चोरट्यांची हातसफाई, मोबाईल, पॉकीटे लंपास
महाजनादेश यात्रेच्या पहिल्याच दिवशी मोझरीत गर्दीची संधी पाहून काही चोरट्यांनी हातसफाई केल्याची माहिती समोर आली आहे. मोबाईल, पाकीट चोरट्यांचा सुळसुळाट यात्रेदरम्यान समोर आला आहे. या दरम्यान एकूण चोवीस हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. मुख्यमंत्री हे विरोधकांची सफाई करण्याच्या तयारीत असले, तरी त्यांच्या सभेत येणारे काही चोरटे हे येणाऱ्या नागरिकांच्या खिशाची सफाई करण्याच्या बेतात दिसत आहेत. असाच प्रकार आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान नाशिक मध्ये घडला होता. त्यांच्याही यात्रेदरम्यान अनेकांचे पॉकीटे, पैसे चोरट्यांनी उडविल्याचे समोर आले होते. आता असाच प्रकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रे दरम्यान अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे घडला आहे.