अमरावती -शहरातील राजापेठ उड्डाणपुलावर चार दिवसांपूर्वी आमदार रवी राणा यांनी मध्यरात्री कार्यकर्त्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. आमदार रवी राणा यांनी कुठलीही परवानगी न घेता हा पुतळा बसवला होता. त्यामुळे शहरात मोठे राजकारण तापले होते. मात्र शेकडो पोलिसांच्या बंदोबस्तात प्रशासनाने मध्यरात्री हा पुतळा तेथून काढला आहे. दरम्यान आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांना पोलिसांनी पहाटे तीन वाजतापासून नजरकैदेत ठेवले आहे. मध्यरात्री पुतळा काढतेवेळी युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मंत्री यशोमती ठाकूर यांनी पुतळा हटवण्यासाठी प्रशासनावर दबाव आणल्याचा आरोपही युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
राणा यांच्या घरासमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
कुठलीही परवानगी नसताना राजापेठ उड्डाणपुलावर पुतळा बसवत त्याठिकाणी दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी युवा स्वाभिमान आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्त्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती करण्यात आली. दरम्यान पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात महापालिका प्रशासनाने केलेया कारवाईच्या या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांच्या शंकरनगर घरासमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी पोलिसांच्या वतीने घेतली जात आहे.