अमरावती- विदर्भ शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी कुप्रसिद्ध आहे. दरवर्षी मार्च, एप्रिल आणि मे या तिमाहीत सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भात होतात. यावर्षी हे तीन महिने कोरोनामुळे लॉकडाऊन लावण्यात आला होता. हा लॉकडाऊनचा कठीण काळ शेतकऱ्यांसाठी आत्मबळ वाढविणारा ठरल्याचे यावर्षीच्या शेतकऱ्यांच्या आकडेवारीवरून समोर येत आहे. अमरावती जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी झाले आहे.
अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येत घट या वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यात ५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाले. मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यात जिल्ह्यात एकूण ८१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असल्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात आहे. या ८१ पैकी ७ शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शासनाकडून १ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. जिल्ह्यात जानेवारी महिन्यात २४ आणि फेब्रुवारी महिन्यात २६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून मार्च महिन्यात ११, एप्रिल आणि मे महिन्यात प्रत्येकी १० शेतकऱ्यांनी विविध कारणांमुळे आत्महत्या केली आहे.
ज्या शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे तसेच नापिकी, पीक खराब होणे, अतिवृष्टीमुळे नुकसान होणे अशा कारणांमुळे आत्महत्या केली. त्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत दिली जाते. मात्र, यावर्षी कोरोनामुळे हे काम थांबले आहे. त्यामुळे ५ महिन्यात ८१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असूनही ७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या पात्र आणि ४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या आहे. आत्महत्या करणाऱ्या ७० शेतकऱ्यांचा चौकशी अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही.
गेल्या वर्षी जानेवारी ते मे या पहिल्या पाच महिन्यात १०५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असल्याची नोंद आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी शेतकरी आत्महत्येचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. यावर्षी लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचा शेतीमाल बरेच दिवस बाजरात आला नाही. हा शेतीमाल त्यांच्या डोळ्यांसमोर असल्यामुळे हातात आज न उद्या पैसे येण्याची आशा त्यांची कायम आहे.
लॉकडाऊनमुळे यावर्षी लग्न आणि इतर ठिकाणी पैशांची उधळपट्टी न झाल्यामुळे शेतकऱ्याच्या हाती पैसा शिल्लक असल्यामुळे तो खचला नाही. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी मोजक्याच शेतकऱ्यांनी शेतीत आलेल्या अपयशामुळे आत्महत्या केली असेल. यावर्षीची शेतकऱ्यांच्या आत्महत्येत घट होणे ही समाधानकारक बाब आहे.