अमरावती - राज्यात हुंडा घेणे आणि देणे कायद्याने गुन्हा आहे. असे असले तरी आजही हुंड्यासाठी लग्न मोडण्याचे प्रकार समोर येत आहे. असाच एक प्रकार अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात समोर आला आहे. साखरपुडा झाल्यानंतर 3 लाख रुपये हुंडा देण्यास मुलीच्या कुटुंबाने नकार दिल्यामुळे मुलाच्या कुटुंबीयांनी लग्न मोडले आहे. याप्रकरणी वरुड पोलिसांनी 5 जणाविरुद्ध गुन्हा दाखल केले आहे.
धक्कादायक : 3 लाखांचा हुंडा न दिल्याने साखरपुड्यानंतर मोडला विवाह - हुंड्यासाठी लग्न मोडले
अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात 3 लाख रुपये हुंडा देण्यास मुलीच्या कुटुंबाने नकार दिल्यामुळे मुलाच्या कुटुंबीयांनी लग्न मोडले आहे. याप्रकरणी वरुड पोलिसांनी 5 जणाविरुद्ध गुन्हा दाखल केले आहे.
अमरावतीच्या वरूड तालुक्यातील शेंदूरजना घाट येथील शुभम दीपक बागडे या युवकाचा विवाह जरूड येथील मोलमजुरी करणार्या कुटूंबातील एका मुलीसोबत जुळला होता. रितीरिवाजाप्रमाणे तीन जुलै रोजी या दोघांचा साखरपुडा सुद्धा थाटामाटात पार पडला. त्यानंतर शुभम बागडे यांच्या परिवारातील पाच जणांनी मुलीच्या वडिलांना तीन लाख रुपये हुंडा मागितला.
ऐपत नसल्याने एवढा हुंडा देण्यास मुलीच्या कुटुंबियांनी नकार दिल्याने मुलाकडच्या कुटुंबियांनी जुळलेला विवाह मोडला आहे. दरम्यान मुलाच्या वडिलांनी साखरपुड्यामध्ये दिलेली सात ग्रॅम सोन्याची अंगठी व 15 ग्रॅमचा गोप सुद्धा मुलाकडील लोकांनी परत देण्यास नकार दिला. त्यावर हतबल झालेल्या मुलीच्या आईवडिलांनी वरुड पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन मुलगा व त्याच्या कुटूंबातील सदस्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलगा शुभम बागडे व त्याच्या वडिलांसह इतर चार जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.