अमरावती -जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सात दिवसांसाठी अमरावती शहर, अचलपूर शहर व अन्य नऊ गावात सात दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा आदेश दिला आहे. परंतु रुग्णसंख्येत घट होत नसून सातत्याने वाढ होत असल्याने आता लॉकडाऊन वाढविण्यात आला असून तो ८ मार्चपर्यंत करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली आहे. तसेच अंजनगाव सुर्जी शहरातदेखील कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने तेथेदेखील लॉकडाऊन होणार आहे.
सर्वाधिक ६१५५ कोरोनाबाधित
दुसऱ्या लॉकडाऊनमध्येही अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा या सुरू राहणार आहेत. अमरावती जिल्ह्यातील कोरोनारुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पालकमंत्री ठाकूर यांनी 22 तारखेपासून अमरावती, अचलपूर शहरासह अन्य नऊ गावांत लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यामुळे आता या ठिकाणी लॉकडाऊन सुरू आहे. परंतु कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मागील सात दिवसात अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक ६१५५ कोरोनाबाधित आढळले तर ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आताच कोरोना लॉकडाऊनलादेखील जुमानत नसल्याने अखेर हा लॉकडाऊन आठ दिवसांनी वाढविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
'लॉकडाऊन आठ मार्चला संपणार'
सध्या सुरू असलेला लॉकडाऊन एक मार्चरोजी संपणार होता. परंतू आता यात वाढ झाल्याने हा लॉकडाऊन आठ मार्च रोजी संपणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली आहे.