महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना मिळणार मार्गदर्शन; अमरावतीत राज्यातील पाहिले समुपदेशन केंद्र - अमरावती कोरोनाबाधित नातेवाईक समुपदेशन केंद्र बातमी

राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. सर्व शासकीय आणि खासगी रूग्णालयांमध्ये रूग्णांची गर्दी झाली आहे. या रूग्णांसोबत त्यांचे नातेवाईक देखील रूग्णालय परिसरात गर्दी करतात. अशा नातेवाईकांसाठी अमरावतीमध्ये समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे.

Amravati corona patients relatives counseling center
अमरावती कोरोनाबाधित नातेवाईक समुपदेशन केंद्र

By

Published : Apr 25, 2021, 1:48 PM IST

अमरावती - कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येने राज्यातील शासकीय व खासगी रुग्णालये हाऊसफुल झाली आहेत. कोरोनाबाधित रुग्णांसोबत रुग्णालयात येणाऱ्या नातेवाईकांची संख्या देखील मोठी आहे. अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी कोविड रुग्णालयात तर नागपूर, यवतमाळ, अकोला ,वाशिम ,बुलढाणा जिल्ह्यातून कोरोनाबाधित येतात. त्यांच्यासोबत नातेवाईकही येतात. या नातेवाईकांना आपल्या रुग्णाबद्दलची माहिती, बेडची उपलब्धता, मेडिसिन पोहोचवणे, घरून आणलेले जेवणाचे डबे पोहचवणे, त्या रुग्णांसोबत संवाद करून देणे व नातेवाईकांना इतर मार्गदर्शन देता यावे यासाठी अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्यावतीने रूग्णालय परिसरात एक समुपदेशन केंद्र उभारण्यात आले आहे. रुग्णाच्या नातेवाईकांना अशा प्रकारे माहिती देणारे हे राज्यातील पहिलेच समुपदेशन केंद्र असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

अमरावतीत कोरोनाबाधितांच्या नातेवाईकांसाठी समुपदेशन केंद्र सुरू झाले आहे

काही महिन्यांपूर्वी समुपदेशन केंद्र उभारण्यापूर्वी कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांची परिसरात गर्दी होत होती. रुग्णाबद्दलची माहिती नातेवाईकांपर्यंत पोहचवणे शक्य होत नव्हते. त्यातून अनेकदा वाद व्हायचे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाला समुपदेशन केंद्र उभारण्याची संकल्पना सुचली. त्यानंतर रुग्णालयात परिसरातच हे समुपदेशन केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रात रुग्णालयातील कर्मचारी कर्तव्यावर असतात. समुपदेशन केंद्रात असलेल्या मार्गदर्शकाला नातेवाईक रूग्णाची माहिती विचारतात.

व्हिडिओ कॉलवरून रूग्णांशी साधता येतो संवाद -

रुग्णालयात उपचार घेण्यासाठी इतर जिल्ह्यातून येणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठी आहे. राहण्याची व्यवस्था नसलेले नातेवाईक आपल्या गावी परत जातात. गावी परत गेल्यानंतर त्यांना आपल्या रुग्णाच्या तब्येतीची माहिती मिळत नसे. आता मात्र, समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून ते फोन करून किंवा व्हिडिओ कॉल करून रूग्णाशी संवाद साधू शकतात. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्ण व नातेवाईकांना समाधान मिळते.

इतर जिल्ह्यातही अशा केंद्रांचा फायदा होईल -

अमरावतीच्या धर्तीवर राज्यातील इतरही शासकीय व खासगी रुग्णालय परिसरात असे समुपदेशन केंद्र उभारल्यास रूग्णांच्या नातेवाईकांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करता जाईल. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या आणि नातेवाईकांच्या अडचणी कमी होतील.

ABOUT THE AUTHOR

...view details