अमरावती -कुटुंबाचा आधार असणारी आई कोरोनाची पहिली लाट येताच कोरोनाग्रस्त झाली. दोन दिवस रुग्णालयात उपचार सुरू असताना अचानक आई गेल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. कोरोनामुळे दगावल्याने रुग्णालयातून थेट स्मशानभूमीतच आईवर ( Amravati Corona ) अंत्यसंस्कार झाला. आई गेली आणि सारेच बदलले. दुर्दैव इतके की गतिमंद असणारे दोन भाऊ ( Mentally Retarded Brothers ) आईचे अंत्यदर्शही घेऊ शकले नाहीत. आई गेल्यामुळे वडील अगदी खचून गेलेत. घरातील कर्ती अचानक हरवल्याने वडिलांना धीर देण्यासह गतिमंद भावांची जबाबदारीही मोठ्या भावावर आली. अमरावती शहरातील दंत महाविद्यालय ( Dental College in Amravati ) परिसरात राहणाऱ्या गिरमकर कुटुंबाची ( Giramkar Family Amravati ) कोरोनामुळे झालेली अवस्था 'ईटीव्ही भारत' ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता मनाला सुन्न करणारी परिस्थिती समोर आली.
आई गेली आणि सारंच संपलं -
आईला मधुमेह होता. मीना नरेंद्र गिरमकर असे माझ्या आईचे संपूर्ण नाव. एक दिवस आई अचानक आजारी पडली. नेहमीच्या डॉक्टरांकडे उपचार घेतले असता त्यांना आईला नेमके काय होत आहे हे कळलेच नाही. त्यामुळे बऱ्याच उशिराने कोरोना झाला असावा असे सांगून त्या डॉक्टरांनी हात वर केले. आम्ही धावपळ करीत आईला एका खासगी कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी आई चालती बोलती होती आणि तिची ऑक्सिजन लेव्हलही व्यवस्थित होती. दोन दिवसाने 21 सप्टेंबर 2020 रोजी मात्र आई गेली, असे डॉक्टरांनी सांगताच जो काही हादरा बसला त्यातून अद्यापही आम्ही सावरलो नाही असे तुषार गिरमकर 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले. आई गेली आणि सारंच संपलं अशी अवस्था आमची झाली होती असेही तुषार गिरमकर म्हणाले.
नातेवाईकांनी फिरवली पाठ भाजीवाल्यांनी बदलला रस्ता -
कोरोनामुळे आई दगावली. आता आईला जाऊन पंधरा महिने होत आहेत. त्यावेळेस कोरोनाची पहिली लाट होती. आई गेल्याची माहिती सर्वत्र पसरल्यावर नेहमी आमच्या घरी येणाऱ्या नातेवाईकांनी आमच्यापासून पाठ फिरवली. साधे सांत्वन करण्यासाठी आमच्या घरी कोणीही आले नाही. दूधवाल्याने देखील घरी दूध आणणे बंद केले. घरासमोरून जाणाऱ्या भाजीवाल्यांनी देखील रस्ता बदलला होता. ते दिवस फार कठीण आणि वेदनादायी होते, असेही तुषार गिरमकर म्हणाले.