अमरावती- बापानं मिळेल ते काम करायचं, मजुरीच्या कामातून दिवसाला शंभर, दोनशे रुपये मिळायचे. मात्र, या कष्टात आनंद मिळायचा तो मुलं शिकताहेत याचा. आज मात्र या आनंदानं आकाश गाठलं. मुलगी चक्क नायब तहसीलदार झाली. आजवर केलेले कष्ट सार्थकी लागले आणि आता आपलं आयुष्य पालटेल असा विश्वास अकोली परिसरात राहणाऱ्या सुरेश बारसे यांच्यात निर्माण झाला. प्राजक्ता या मुलीनं कष्टाचं चीज केलं. वडिलांसोबतच आई, भाऊ, मामा आणि शेजारचे सारेच भारावून गेलेत.
अमरावती शहरालगत अकोली हे छोटेसे गाव आज अमरावती शहराचाच एक भाग झाले आहे. या भागात राहणारी प्राजक्ता सुरेश बारसे ही युवती नायब तहसीलदार झाली आहे. राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल घोषित होताच प्राजक्ता आणि तिच्या कुटुंबीयांच्या आयुष्यात कधी नव्हे, असा आनंदाचा क्षण आला आहे. अतिशय हलाकीच्या परिस्थितीवर प्राजक्ताने मात करत मोठे यश गाठले आहे. प्राजक्ताचे वडील हे मूळचे नांदगाव खंडेश्वर तालुक्यात येणाऱ्या सावनेर या गावचे रहिवासी आहेत. त्यांच्याकडे स्वतःची शेती नाही, म्हणून दुसऱ्याच्या शेतात राबून ते आपल्या संसाराचे पालन पोषण करत आहेत. त्यांनी मोठी मुलगी विजयाला अमरावतीत वसतिगृहात ठेऊन शिकवले. ती आरोग्य विभागात नोकरीवर लागल्यावर तिचे लग्न करून दिले. तर प्राजक्ताचा भाऊ प्रफुल्ल हा डीएड झाला आहे. तो टीव्ही संच दुरुस्तीचे काम करायला लागला.
छोटी प्राजक्ता 2009 मध्ये दहावी उत्तीर्ण झाली, तेव्हा सुरेश बारसे यांनी प्राजक्ताच्या शिक्षणासाठी अमरावतीला जायचा निर्णय घेतला. प्राजक्ताचे मामा किशोर गावंडे यांनी बहीण आणि जावयाला राहायची सुविधा व्हावी, यासाठी आकोली परिसरात असणाऱ्या स्वतःच्या जागेवर झोपडी बांधून दिली. प्राजक्ताला शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश मिळाला. त्यानंतर सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक शाखेत प्राजक्ताने पदवी मिळवली. कॉम्प्युटर इंजिनियर झालेल्या प्राजक्ताला एका कंपनीत नोकरीची संधी मिळाली. ही नोकरी अतिशय महत्त्वाची असली, तरी आपल्याला महसूल विभागात अधिकारी म्हणून काम करण्याचे स्वप्न प्राजक्ताने उराशी बाळगले. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्राजक्ताने सॉफ्टवेअर क्षेत्रातील नोकरी नाकारली. माझा या निर्णयाला माझा आई- वडिलांचा पाठिंबा होता. तुला काय शिकायचे ते शिक असे म्हणत माझ्या आई- वडिलांनी मला सतत प्रोत्साहन दिल्याचे प्राजक्ता 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाली.