अमरावती - राज्यात जानेवारीमध्ये 14 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. आता गावागावात सरपंचांची निवड प्रक्रिया सुरू आहे. आपल्याच गटाचा सरपंच व्हावा, यासाठी पॅनल्समध्ये रसीखेच सुरू आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील हिरपूर गावातील ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीवर अज्ञातांनी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवल्याने खळबळ उडाली आहे.
हिरपूर ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्यात आला आहे हिरपूर ग्रामपंचायतीमध्ये १२ फेब्रुवारीला सरपंच पदाची निवडणूक पार पडली. त्यांतर कुणीतरी ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीवर काँग्रेस पक्षाचा झेंडा लावला आहे. कुठल्याही प्रशासकीय इमारतीवर राजकीय पक्षाचा झेंडा लावणे कायद्याने गुन्हा आहे.
दरम्यान, काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी हा प्रकार केला असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, गावकरी या प्रकरणी संतप्त झाले आहेत. ज्यांनी प्रशासकीय इमारतीवर झेंडा चढवला असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी जोर धरत आहे. पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी याबाबत माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे.
झेंडा लावणे हा विरोधकांचा डाव -
मागील अनेक वर्षांपासून हिरपूर ग्रामपंचायतीवर काँग्रेसची सत्ता आहे. ही सत्ता असणे विरोधकांना पचनी पडत नाही. त्यामुळे विरोधकांनी आम्हाला बदनाम करण्यासाठी हा झेंडा लावण्याचा प्रकार केला आहे. त्यामुळे आता गावातील राजकीय वातावरण दूषित झाले आहे. हा प्रकार करणाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.