अमरावती -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात आपल्याला निश्चितच स्थान मिळेल अशी अपेक्षा आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा या दोघांनाही होती. मंत्रिमंडळात सहभागी होऊन अमरावतीचे पालकमंत्री पद भाऊंना मिळेल असा ठाम विश्वास दोन्ही आमदारांच्या कार्यकर्त्यांना होता. मात्र, या दोन्ही आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्यामुळे यासाठी दोघांनीही एकमेकांना जबाबदार धरल्यामुळे दोघांमध्ये चांगलाच वाद चिघळला आहे.
बच्चू कडू अन् राणा वाद मिटणार! आमदार राणांना मुख्यमंत्र्यांनी 'वर्षा'वर बोलावले - Dispute between Bachu Kadu and MLA Ravi Rana
माजी राज्यमंत्री आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार रवी राणा यांना रविवारी मुंबईला आपल्या वर्षा या निवासस्थानी बोलावले आहे. दोन्ही आमदारांमधील वादावर तोडगा निघावा या उद्देशाने मुख्यमंत्र्यांनी आमदार रवी राणा यांना बोलावले असल्याचे सांगितले जात आहे.
उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याला किती पैसा दिला हे स्पष्ट करावे - आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गुहाटी जाण्यासाठी 50 खोके घेतल्याचा आरोप केला आहे. तर, आमदार बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांनी केलेला आरोप त्वरित सिद्ध करावा किंवा याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याला किती पैसा दिला हे स्पष्ट करावे, असे आव्हान दिल्यामुळे सध्या संपूर्ण राज्यात याच वादाची चर्चा सुरू आहे.
बच्चू कडूंचे रविवारी अमरावती शक्ती प्रदर्शन -आमदार रवी राणा यांनी माझ्यावर भिन बुडाचे आरोप केले आहेत. यासह माझ्याविरुद्ध पोलिसांत खोटी तक्रार दिली असून मी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडून किती पैसे घेतले हे आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे. असे आव्हान देत आमदार बच्चू कडू हे अमरावतीत आपल्या प्रहार संघटनेचे शक्तिप्रदर्शन करणार आहेत. यासह त्यांनी आमदार रवी राणा त्यांना मला भेटायला अमरावती शहरातील टाऊन हॉल येथे एकट्याने यावे असे आव्हान दिले आहे. सध्या अमरावतीत आमदार बच्चू कडू यांची प्रहार संघटना तसेच आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकमेकांना धडा शिकवण्यास सज्ज झाले आहेत.