अमरावती: जिल्ह्यातून जाणाऱ्या परतवाडा, धारणी, खांडवा, इंदूर या राज्य महामार्ग क्रमांक ६ची अवस्था दयनीय झाली आहे. कित्येक दिवसांपासून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे. शासनाच्या या दुर्लक्षामुळे, आता नागरिकांनी स्वतःच हे खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे. एका खासगी बसमधील चालक, वाहक आणि प्रवाशांनी रस्त्यावरील खड्डे बुजवून मग पुढे बस नेल्याची घटना समोर आली आहे.
खासगी बसचालक राशिद खां, वाहक विक्की सरोदे आणि प्रवासी पोलीस कर्मचारी राजू सोनवणे, प्रकाश नंदवंशी, राजा ठाकुर, बबलू शरीफ, दयाल बेलकर यांच्यासह इतर सहप्रवाशांनी रस्त्यात बस थांबवून, स्वतःच खड्डे भरत पुढे प्रवास सुरू ठेवला. आता त्या बुजविलेल्या खड्यावरून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी व मेळघाटातील स्थानिक पदाधिकारी सुखरूप प्रवास करायला लागले आहेत.
हेही वाचा -कोसारा-मारेगाव रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य; रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी
बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, अपघातात वाढ -
हा रस्ता मेळघाटच्या जंगलामधून गेला आहे. तसेच, ठिकठिकाणी मोठी वळणेही आहेत. आधीच जंगल परिसर, त्यात चाळण झालेले रस्ते, यामुळे नागरिकांना येथून प्रवास करताना जीव मुठीत धरावा लागतो. मागील काही वर्षांमध्ये अनेकवेळा तक्रार करुनही बांधकाम विभाग याकडे सपशेल दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे, या रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
रस्त्याच्या दुर्दशेने कित्येक गर्भवतींसह रुग्णांनी गमवला जीव -
धारणी तालुक्यात ग्रामीण भागातील गर्भवती महिला, तसेच इतर रुग्णांना उपचाराकरिता अमरावती येथे नेत असताना या खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागतो. रस्त्यातील खड्ड्यांतून वाहन जात असल्याने झटके सहन करावे लागतात. तसेच, वेळसुद्धा जास्त लागत असल्याने धारणी वरून उपचाराकरिता दुसरीकडे रेफर केलेल्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. तर काही गर्भवती महिलांना झटक्यांमुळे रस्त्यातच प्रसूती होण्याच्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. यामध्ये अनेक रुग्णांचे आणि गर्भवती महिलांचे जीव जाण्याचा दुर्दैवी प्रकारही झाला आहे.
हेही वाचा -सातारा: उडतारे गाव हद्दीतील सेवा रस्ता ८ फुटाने खचला