अमरावती - कोरोनामुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. गेल्या 15 दिवसांपासून हाताला काम नसल्याने अनेक गोरगरीब जनतेवर उपासमारीचे वेळ आली आहे. प्रशासनाने देखील काही ठिकाणी पाठ फिरवली असून अशा लोकांवर घरातच उपाशी मरण्याची वेळ आली आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील पाल आणि झोपडींवर राहणाऱ्या काही नागरिकांनी त्यामुळे थाळी बजाव आंदोलन केले आहे. या आंदोलनातून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. दरम्यान संचारबंदीच्या काळात हे आंदोलन करण्यात आल्याने सर्वत्र याची चर्चा होत आहे.
हेही वाचा...'मुस्लिमांना बळीचा बकरा बनवणे हे कोरोनावरील औषध नाही'
तिवसा शहरातील पंचवटी चौक येथे गेल्या पंचवीस वर्षांपासून आदिवासी २८ कुटुंबे पाल टाकून राहत आहेत. राज्यात सुरु असलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे या सर्व कुटुंबावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. हातावर व्यवसाय असणारी ही कुटुंब गॅस दुरुस्ती, केसावर भांडी विकणे, टोपले विकणे, देवाच्या नावावर भीक मागून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र, गेल्या 22 मार्चपासून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे।
दरम्यान काही सामाजिक संघटनानी केलेले अन्न धान्य आणि किरण्याची मदत संपली आहे. त्यामुळे आता जगायचे कसे ? असा प्रश्न या लोकांसमोर उभा आहे. शासनस्तरावर गोरगरीबांना मोफत अन्न धान्य दिले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ते आपल्यापर्यंत पोहचत नसल्याचे या लोकांनी म्हटले आहे. त्यामुळे या सर्व नागरिकांनी आज थाळी बजाव आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले आहे.