अमरावती - कोरोना लॉकडाऊनमुळे राज्यासह अमरावती शहर आणि जिल्ह्यातील शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याची तयारी सुरू असतानाच शासनाकडून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण झाले आहे. विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांनी दुकानातून पुस्तके खरेदी केली आहे. पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांनी उत्साहात घेतली असली तरी शिक्षणासाठी लागणारे वही, पेन, पेन्सिल आदी साहित्य घेण्यास मात्र विद्यार्थी आणि पालक उत्सुक नसल्याचे चित्र अमरावतीत पहायला मिळत आहे.
अमरावती जिल्ह्यात सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत सर्व शासकीय तसेच अनुदानित शाळेतील पहिली ते पाचवीच्या 1 लाख 18 हजार 115 विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे. सर्व विषयांचे मिळून एकूण 5 लाख 38 हजार 615 पाठ्यपुस्तकांचे वाटप झाले आहे. सहावी ते आठवीच्या 85 हजार 550 विद्यर्थ्यांना 5 लाख 90 हजार 560 पुस्तक शाळेच्या माध्यमातून वितरित करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील पहिली ते आठवी पर्यंतच्या एकूण 2 लाख 1 हजार 665 विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरीत झाली असल्याची माहिती शिक्षण विस्तार अधिकारी अशोक रामटेके यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
विनाअनुदानित शाळेतील विद्यर्थ्यांना पुस्तकांच्या दुकानातून पुस्तक खरेदी करावी लागतात. शाळांकडून मिळणाऱ्या सुचनांप्रमाणे पालक पुस्तकांची खरेदी करत आहेत मात्र, त्यासोबत लागणारे इतर शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास पालक नकार देत आहेत. शहरातील सीबीएससी अभ्यासक्रम असणाऱ्या शाळांनी ऑनलाईन अभ्यास सुरू केला असून त्यांना पुस्तकांची सध्या गरज भासत नाही. त्यामुळे त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक अद्याप पुस्तक खरेदीसाठी आलेच नसल्याचे पुस्तक दुकानदार सांगतात.
माणिबाई गुजराती विद्यालयात सहावी ते आठवीपर्यंतची पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना वितरित केली आहेत. पाचवीच्या वर्गात विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्याप झाले नसल्याने पाचवीची पुस्तके जपून ठेवण्यात आल्याचे मुख्यध्यापिका अंजली देव यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.