अमरावती येथील दुर्बीण निर्मिती कार्यशाळा अमरावती:अनेकदा चंद्रग्रहण, सूर्यग्रहण यासह आकाशात घडणाऱ्या विविध खगोलीय घटना टिपण्यासाठी विशिष्ट ठिकाणी दुर्बिणीच्या साहय्याने आकाशदर्शन घडविले जाते. ही दुर्बीण नेमकी काय जादू आहे याचे कुतूहल चिमुकल्यांना असते. अशी ही दुर्बीण खगोलशास्त्राबाबत जिज्ञासा असणाऱ्या चिमुकल्यांच्या हाती असावी. यासाठी अगदी टाकाऊ वस्तूंपासून त्यांना दुर्बिण कशी तयार केली जाते याचे प्रशिक्षण आम्ही देत असल्याचे मराठी विज्ञान परिषदेचे अमरावती शाखेचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने यांनी ईटीव्ही भारतची बोलताना सांगितले.
विद्यार्थ्यांना 'ही' माहिती दिली जाईल :या दुर्बिणीसाठी अंतर्वक्र काच कसे वापरायचे, लेन्स कसे वापरायचे, पाईप कसे सेट करायचे, दुर्बीणसाठी स्टॅन्ड अगदी साध्या पद्धतीने कसे तयार करायचे, पाईप आणि काचांची रुंदी-लांबी कशी घ्यायची, फोकल लेन्स कोणते यासह लेन्सचे प्रकार किती आणि कशा प्रकारचे असतात याबाबत संपूर्ण माहिती शाळकरी विद्यार्थ्यांना दिली जाईल. खगोलशास्त्राची आवड असणाऱ्या 75 वर्षे वयाच्या वृद्धांना देखील ही माहिती दिली जाईल. हे दुर्बीण म्हणजे भारतीय पद्धतीचे जुगाड असल्याचे प्रवीण गुल्हाने यांनी सांगितले.
पशुपक्ष्यांच्या निरीक्षणासाठीही उपयोग :भारतीय जुगाड पद्धतीने बनविल्या जाणाऱ्या दुर्बीणनला हजार रुपयांच्या आतच खर्च येतो. विशेष म्हणजे, या दुर्बिणीचे सर्व भाग सहज काढून वेगळे करता येतात आणि आवश्यकता वाटली त्यावेळी सर्व भाग जोडून दुर्बीण सज्ज करता येते. ही दुर्बीण आपल्याला कुठेही नेणे सहज शक्य असल्यामुळे जंगल भ्रमंतीची आवड असणाऱ्यांना पशुपक्ष्यांचे छायाचित्र टिपण्यासाठी देखील याचा उपयोग होतो, असे प्रवीण गुल्हाने म्हणाले.
'हा' आहे मुख्य उद्देश :मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने आकाशात होणाऱ्या विविध खगोलीय घटनांसंदर्भात नेहमीच विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. शाळकरी विद्यार्थ्यांसह खगोलशास्त्रात आवड असणाऱ्या प्रत्येकाला आकाशदर्शन घडवून माहिती दिली जाते. आता ह्या चिमुकल्यांच्या हाती त्यांनी स्वतः बनवलेली दुर्बिण देऊन त्यांच्यामध्ये असणारी खगोलशास्त्राची आवड आणखी वाढविणे, हा मराठी विज्ञान परिषदेचा मुख्य उद्देश असल्याचे प्रवीण गुल्हाने म्हणाले. दुर्बीण निर्मिती कार्यशाळेसंदर्भात खगोलशास्त्राचे अभ्यासक आणि कन्सेंट लॅबचे संचालक निलेश देशमुख यांनी विद्यार्थ्यांना खगोलशास्त्र शाखेत असणाऱ्या नवनवीन संधीबाबत माहिती दिली. या कार्यशाळेत शाळकरी विद्यार्थ्यांसह अनेक शिक्षक आणि खगोलशास्त्राची आवड असणारे वृद्ध देखील सहभागी झालेत.