अमरावती - १ डिसेंबरला झालेल्या अमरावती विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघातील ९ हजार मतदारांनी बोगस मतदान केल्याचे छाननीअंती समोर आले आहे, असा आरोप शिक्षक महासंघाचे उमेदवार शेखर भोयर यांनी केला. यामध्ये पात्र नसलेल्या प्राथमिक शाळा, नर्सिंग कॉलेज, खासगी इंग्रजी शाळेमधील लिपिक, शिपाई, कारकून, प्रयोग शाळा परिचर अशा बोगस मतदारांचा समावेश होता. या सर्वांच्या विरोधात आपण पोलीस तक्रार करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. बोगस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्यामुळेच निवडणुकीचा निकाल धक्कादायक लागल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
शिक्षक महासंघाचे उमेदवार शेखर भोयर नागपूर खंडपीठात याचिका-
अमरावती विभाग शिक्षक मतदार संघातून किरण सरनाईक हे बोगस मतदानाच्या आधारावर निवडणूक जिंकले आहेत. त्यांच्या विरोधात आता पराभूत उमेदवारांनी बंड पुकारले आहे. शिक्षक महासंघाचे शेखर भोयर तसेच महाविकास आघाडीचे प्रा. श्रीकांत देशपांडे यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली असून इतर उमेदवारही आता याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत. निवडणुकी दरम्यान किरण सरनाईक हे विभागीय संस्था प्रमुख अध्यक्ष असल्याने सरनाईक यांनी प्राथमिक शाळा, इंग्रजी कॉन्व्हेंट शाळेतील बोगस मतदारांची नोंदणी आधीच करून घेतली.
पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी-
या नोंदणीवर शेखर भोयर यांनी आक्षेप घेतला असून या आक्षेपावर निवडणूक विभागाने फारसे लक्ष दिले नाही. परिणामी विभागातील ५६ तालुक्यांमध्ये ९ हजार बोगस मतदार तयार झाले व याच बोगस मतदारांच्या आधारावर किरण सरनाईक निवडून आल्याचा आरोप शेखर भोयर यांनी केला. त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची व बोगस मतदार बनविण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी पराभूत उमेदवारांनी केली आहे.
लोकशाही मूल्यांची गळचेपी-
भारत निर्वाचन आयोग दिल्ली यांनी शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादी बाबत पात्रतेच्या सूचना दिल्या होत्या. मात्र असे असतानाही हा सर्व नियोजित कट रचून बोगस मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली. मुख्याध्यापकांना या सर्व गोष्टींची जाणीव असतानाही मुख्याध्यापकांनी बोगस मतदारांचे सर्ज प्रमाणित करून दिले. त्यामुळे अमरावती विभागात लोकशाहीच्या मूल्यांचीच गळचेपी झाली असून या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी शेखर भोयर यांनी केली आहे.
२५% पेक्षा जास्त मतदार बोगस-
या निवडणुकीच्या बोगस मतदार याद्यांमध्ये संस्थाचालकांचे नाव देखील मतदार म्हणून प्रसिद्ध करण्यात आल्याचा गंभीर प्रकार भोयर यांनी उघडकीस आणला आहे. एकट्या अमरावती जिल्ह्यात जवळपास 3 हजार मतदार बोगस असून संपूर्ण विभागात हा आकडा ९ हजारांच्या जवळपास आहे. त्यामुळे एकूण मतदार संख्या पाहता २५ टक्क्यांहून अधिक मतदार हे बोगस असल्याचं शेखर भोयर यांनी यावेळी सांगितले.