अमरावती :तळेगाव दशासर येथील शंकरपटला दीडशे वर्षांपेक्षाही जुनी परंपरा आहे. चार दिवस यात्रेत हा उत्सव चालू असतो. या शंकरपटादरम्यान पहिले तीन दिवस हे पुरुषांचा शंकरपट या यात्रेत रंगतो आणि अखेरच्या दिवशी खास महिलांचा शंकरपट या यात्रेत रंगतो. तळेगाव दशासर येथे पुरुषांच्या शंकरपटाची परंपरा असताना सर्वात आधी भारती येवले या महिलेने या पटात धुरकरी म्हणून कामगिरी बजावली होती. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या क्रांतिबेन जोशी यासुद्धा या पटात सहभागी झाल्या होत्या.
या वर्षी महिलांच्या शंकरपटात महिलांचा उत्साह दुप्पटशंकरपटाला महिलांची गर्दी पाहता तळेगाव दशासर येथील कृषक सुधार मंडळाचे दिवंगत अध्यक्ष रावसाहेब देशमुख यांनी 2000 मध्ये महिलांकरिता एक दिवसीय शंकरपटाला सुरुवात केली. आज या पटाने भव्यरूप घेतले आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील मलातपूर धामणगाव वसाड यांसह विदर्भातील यवतमाळ वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांतून महिला धुरकरी या शंकरपटात सहभागी होतात. 2016 मध्ये शासनाने राज्यातील सर्वच शंकरपटांवर बंदी घातली होती. या वर्षी ही बंदी उठल्यावर पुरुषांच्या शंकरपटा इतकाच उत्साह महिलांच्या शंकरपटातही कायम होता. तळेगाव दशासर येथील शंकरपटात पुरुषांच्या आणि महिलांच्या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकाविणाऱ्या बैलजोडीला संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय महत्त्व दिले जाते. विशेष म्हणजे शंकरपटात बाजी मारणाऱ्या बैलजोडीला बाजारात दहा ते पंधरापट अधिक भाव मिळतो.