महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'रुग्णसेवा पुरवताना सुरक्षिततेच्या इतर बाबींचीही दक्षता घ्या' - यशोमती ठाकूर

रुग्णसेवा पुरविताना सुरक्षिततेच्या इतर बाबींचीही दक्षता घ्यावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सुरक्षिततेच्या इतर बाबींची काळजी घ्या
सुरक्षिततेच्या इतर बाबींची काळजी घ्या

By

Published : Apr 22, 2021, 5:28 PM IST

अमरावती - जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात 45 अतिरिक्त खाटांची व्यवस्था करण्यात येत आहे. रुग्णसेवा पुरविताना सुरक्षिततेच्या इतर बाबींचीही दक्षता घ्यावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

यशोमती ठाकूरांनी केली पाहणी
पालकमंत्र्यांकडून रुग्णालयांची पाहणी.....

नाशिक येथील रुग्णालयात प्राणवायूच्या टाकीची गळती होऊन त्या दुर्घटनेत 24 कोरोनाबाधित रुग्णांनी आपले प्राण गमावले. या दुर्घटनेत मृत पावलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांप्रती पालकमंत्र्यांनी संवेदना व दु:ख व्यक्त केले. याच अनुषंगाने त्यांनी आज विभागीय संदर्भ रूग्णालयातील जिल्हा कोविड रुग्णालय, तसेच डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाला भेट देऊन तेथील व्यवस्था व ऑक्सिजन प्लांटची पाहणी केली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पीडीएमसीचे अधिष्ठाता डॉ अनिल देशमुख आणि अनेक वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी दिले निर्देश
त्रुटी दूर करण्याचे निर्देश....

जिल्हा कोविड रुग्णालय व पीडीएमसी येथील ऑक्सिजन पुरविणारी यंत्रणा सुस्थितीत असली तरी दक्ष राहणे व वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे. रुग्णालयातील ऑक्सिजन पुरविणाऱ्या यंत्रांची नियमित पाहणी व वेळोवेळी देखभाल करण्यात यावी. तांत्रिकदृष्ट्या थोडीही त्रुटी असता कामा नये. तसे निदर्शनास आले तर ती तत्काळ दूर करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी संबंधितांना दिले.

शंभर टक्के खबरदारी आवश्यक..

नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील दुर्घटना अत्यंत दु:खदायी आहे. अशी दुर्घटना कुठेही होता कामा नये. त्यासाठी आपण शंभर टक्के सावधानता बाळगणे आवश्यक आहे. त्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने यंत्रणेची वेळोवेळी तपासणी करणारी कायमस्वरूपी यंत्रणा सुसज्ज करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. रुग्णालयात सेवा देणाऱ्या डॉक्टर व स्टाफशीही त्यांनी संवाद साधला. गेले वर्षभर आपण सगळे अहोरात्र जीवाची पर्वा न करता कोरोनाविरुद्ध लढत आहात. सध्याचा काळ कठीण आहे. आपली स्वत:ची सुरक्षितता जोपासून आपण सर्वांनी मिळून या कठीण काळावर मात करायची आहे. आपले योगदान व रुग्णसेवा याहून मोठे कार्य नाही. शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा दिलासा त्यांनी आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला.

रुग्णांच्या आप्तांशी संवाद..

सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांशी संवाद साधून पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

रुग्णाच्या नातेवाईकांसाठी स्वतंत्र दूरध्वनी व्यवस्था..

उपचार घेत असलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची भेट होऊ शकत नाही. तसेच त्यांना संवाद साधण्यासाठीही अडचणी येतात. त्यामुळे रुग्णाच्या प्रकृतीबाबत माहिती नातेवाईकांपर्यंत पोहोचू शकत नाही. अशावेळी रुग्णांच्या आप्तांना त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस करण्यासाठी एक स्वतंत्र दूरध्वनी क्रमांकाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details