अमरावती -हरीसालच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोपी असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी, या मागणीसाठी भाजपच्यावतीने जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहासमोर ठिय्या देण्यात आला आहे.
उपवनसंरक्षक व अपर प्रधान मुखवन सारक्षकांवर कारवाई व्हावी -
आपल्या कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचारासाठी प्रवृत्त करणाऱ्या आणि आपली मर्जी राखली गेली नाही तर छळ करण्याचा प्रकार दीपाली चव्हाण आत्महत्त्या प्रकरणाने समोर आला आहे. या प्रकारणात उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हे दोषी असल्याचे दीपाली चव्हाण यांनी आत्महत्त्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच विनोद शिवकुमार याच्यावर अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांचा हात असल्याचे म्हटले आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात वन कर्मचाऱ्यांमध्ये रोष उफाळून आला असता संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्यावतीने करण्यात आली आहे.
माजी आमदार आणि भाजप नेते डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वात शव विच्छेदन गृहासमोर भाजपा करीकर्त्यांनी ठिय्या दिला. भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, नगरसेवक सुरेखा लुंगारे, यांच्यासह दीपाली चव्हाण यांचे नातेवाईक तसेच जिल्ह्यातील वन परिक्षेत्र अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने जमल्याने इर्विन चौक ते रेल्वेस्टेशन मार्ग बंद करण्यात आला. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शवविच्छेदन गृहासमोर पोलिसांना कडेकोट बंदोबस्त होता.