अमरावती - आतापर्यत आपण बैलगाडा शर्यत, रेंड्याची झुंज, जनावराची उत्कृष्ट सजावट अशा एक ना अनेक विविध स्पर्धा आयोजन केल्याचे पाहिले आहे. मात्र, अमरावतीतील काही संघटनांनी डुकरांसोबत एक चांगला सेल्फी काढा आणि बक्षीस मिळवा, या स्पर्धेचे आयोजन ( Pig Selfie Competition Amravati ) केले आहे. या अनोख्या स्पर्धेची चर्चा आता जिल्हाभरात होत आहे.
अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे शहरात मोठ्या प्रमाणाच डुकरांची मुक्त वावर आहे. हे डुक्कर गाडीवर लटकवलेले किराणा पिशवी, भाजीपाला, फळे आदींवर डल्ला मारतात. यामुळे नागरिकांचे माठे नुकसान होते. याबाबत वारंवार नगरपरिषदेला निवेदन देऊनही प्रशासन कारवाई करत नाही, असे साहस बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष चेतन ढोले यांनी सांगितले. त्याच पार्श्वभूमीवर नगरपरिषदचे लक्ष वेधन्यासाठी या स्पर्धेचे ( Chandur Railway City Pig Selfie Competition ) आयोजन केले आहे. त्यात 70 नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे.
'डुकरांनी मानले नगरपरिषदेचे आभार'
नगरपरिषद डुकरांचा बंदोबस्त करत नाही म्हणून उपरोधिक बॅनर शहरात लावले होते. त्यावर चांदुरवासी व नगरपरिषदेचे आभार मानले होते. आपण आम्हाला आपल्या गावातील प्रत्येक परिसरामध्ये, चौकांमध्ये, बाजारामध्ये व प्रत्येक गल्लीत, कित्येक वर्षापासून राहण्याची परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद, असा टोला यावरुन नगरपरिषदेला लावला आहे. मात्र, नगरपरिषदेने हे बॅनर काढले आहे.