अमरावती Sweet Mart Owner Suicide : अमरावती शहरातील राजापेठ परिसरातील मिलन मिठाई या प्रतिष्टानाच्या संचालकानं स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केलीय. रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही खळबळजनक घटना उघड झालीय. अशोक होशियारसिंग शर्मा (62, रा. महेशनगर, डीमार्टच्या मागे, अमरावती) असं मृताचं नाव आहे. त्यांच संपुर्ण कुटुंबिय बाहेर गेलं असता त्यांनी वडिलोपार्जित जुन्या बनावटीच्या बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडून घेतली. यामुळं शहरातील व्यापारी वर्गात एकच खळबळ उडालीय.
काही दिवसांपासून होते तणावात :मृत अशोक शर्मा यांच्या मुलानं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार अशोक शर्मा यांच्या पायाचं महिना दीड महिन्यापूर्वी ऑपरेशन झालं होतं. मात्र त्यांना चालता येत नव्हतं. त्यासाठी खर्चही अधिक झाला होता. त्यामुळं ते काही दिवसांपासून तणावात राहत होते. दरम्यान, रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांचा मुलगा, सून व नातू असा संपुर्ण परिवार दिवाळीच्या भेटीसाठी काही नातेवाईकांकडे गेलं होतं. त्यादरम्यान, अशोक शर्मा यांनी घरातील शोकेसमध्ये ठेवलेल्या जुन्या बनावटीच्या बंदुकीतून डोक्यात गोळी झाडून घेतली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान सायंकाळी सातच्या सुमारास कुटुंब घरी परतले असता दार आतून बंद असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. खिडकीतून बघितलं असता शर्मा हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसून आले. याप्रकरणी कुटुंबीयांनी राजापेठ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच राजापेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले, पोलिसांच्या मदतीनं दार तोडण्यात आलं. त्यानंतर त्यांना तातडीनं रूग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं.