अमरावती -नवीन वर्षाच्या सुरुवातीला मेळघाटातील घनदाट जंगलात सुपर्ब लॉयरबर्ड आढळून आला. केवळ ऑस्ट्रेलियात आढळणाऱ्या या पक्षाचे मेळघाटातील व्हिडिओ व्हायरल होत आहे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील पक्षी अभ्यासकांमध्ये मेळघाटात हा पक्षी दिसल्या बाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या बाबत ईटीव्ही भारतने ज्या ठिकाणी सुपर्ब लॉयरबर्ड आढळून आल्याचा दावा केला, त्या घनदाट जंगल परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच हा पक्षी पाहणाऱ्या सोबत संवाद साधला असता, मेळघाटच्या जंगलात सुपर्ब लॉयरबर्डचे वास्तव्य असल्याचे समोर आले. सुपर्ब लॉयरबर्ड पक्षा संदर्भात करण्यात आलेले वर्णन तसेच व्हिडिओमध्ये दिसणारे ठिकाण तसेच जंगलातील प्रत्यक्ष स्थळ यात कुठलीही तफावत नसल्याने या परिसरात या पक्षाचे अस्तित्व असावे, असा निष्कर्ष वन्यजीव अभ्यासकांनी देखील काढला आहे.
सुपर्ब लॉयरबर्डची सर्व दूर चर्चा -सुपर्ब लॉययरबर्ड मेळघाटात आढळल्या संदर्भातील व्हिडिओ 5 जानेवारी रोजी व्हायरल होताच केवळ ऑस्ट्रेलियात दिसणारा हा पक्षी खरंच मेळघाटात आला असावा का या संदर्भात सर्व दूर चर्चांना उधाण आले. जिल्ह्यातील पक्षी अभ्यासकांनी हा पक्षी मेळघाटात दिसणे अशक्य असल्याचे स्पष्ट करून या व्हिडिओकडे सपशेल दुर्लक्ष केले. असे असताना 'ईटीव्ही भारत ' ने या व्हिडिओ संदर्भात सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केला असता काही दिवसांपासून हा पक्षी मेळघाट आणि मध्य प्रदेशच्या सीमा भागातील जंगलात अनेकांनी पाहिल्याचे समोर आले.
दाभ्याखेडा जंगलात आढळला सुपर्ब लॉययरबर्ड - सुपर्ब लॉययरबर्ड हा पक्षी सर्वात आधी अमरावती शहरापासून 290 तसेच धारणी पासून सुमारे 45 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दाब्याखेडा येथील जंगलात आढळून आला. धारणी लगत असणाऱ्या डॉक्टर आशिष सातव यांच्या महान संस्थेच्या डॉ. पूनम ठाकरे या दाब्याखेडा परिसरातील नेहमीप्रमाणे पौष्टिक आहार पुरविण्यासाठी वाहनातून निघाल्या असताना त्यांनाहा आगळावेगळा पक्षी आढळून आला. त्यांनी वाहन चालक देवेंद्र गोसावी यांना गाडी थांबायला सांगत पक्षाचा व्हिडिओ काढला. दरम्यान वाहन चालक देवेंद्र गोसावी हा कावळ्याचा व्हिडिओ का काढत असाव्या म्हणून कुतूहलाने पाहण्यासाठी आला असता त्याला हा कावळा नव्हे तर डोक्यावर नाजूक शिंग असणारा काही विचित्र पक्षी असल्याचे लक्षात आले. या संदर्भात स्वतः देवेंद्र गोसावी याने आपण हा पक्षी पाहिल्याचा दावा 'ई टीव्ही भारत ' शी बोलताना केला. तसेच व्हिडिओमध्ये ज्या ठिकाणी सुपर्ब लॉययरबर्ड दिसतो आहे ते ठिकाण देखील त्याने दाखविले.
डॉ. आशिष सातव यांनी देखील केला दावा -मेळघाटातील आदिवासींसाठी महान संस्थे अंतर्गत आरोग्य सुविधा पुरविणारे डॉक्टर आशिष सातव यांनी आमच्या संस्थेत प्रोग्राम मॅनेजर असणारी पूनम ठाकरे ही गावातील कुपोषण, बालमृत्यू कमी करण्यासाठी पौष्टिक आहार घेऊन नेहमीप्रमाणे निघाली असताना तिला बारातांडा आणि दाब्याखेडा या जंगलाच्या मधात एक आगळावेगळा पक्षी दिसला. तिने पक्षाचा आपल्या व्हिडिओ मोबाईलमध्ये काढला. तीला ह्या पक्षाचे नाव माहित नव्हते. पण एक वेगळ्या प्रकारचा पक्षी होता. दिसायलाही सुंदर होता. त्याचा आवाज खूप छान मंजूळ असा होता. त्यानंतर ती जेव्हा रुग्णालयात आली तेव्हा मला आणि पक्षांची आवड असणाऱ्या आमच्या येथील डॉक्टर शिल्पा त्यांना तो व्हिडिओ दाखवला. आम्ही हा व्हिडिओ काही पक्षी तज्ञांना आणि अमेरिकेत असणाऱ्या डॉक्टर मित्रांना फॉरवर्ड केला. त्यावेळी आमच्या अमेरिकेतील मित्रांनी या पक्षाचे नाव सुपर्ब लायरबर्ड असल्याचे सांगितले. हा पक्षी मेळघाटात आढळला असेल तर, ही अतिशय महत्त्वाची बाब असल्याचे देखील आमच्या अमेरिकेतील मित्रांनी म्हटले. त्यामुळे मेळघाटात सुपर्ब लायरबर्डचे अस्तित्व असल्याचा दावा डॉक्टर आशिष सातव यांनी 'ईटीव्ही भारत ' शी बोलताना केला.
पुनम चा नोकरीचा कार्यकाळ संपला - दरम्यान ज्या डॉक्टर पूनम ठाकरे यांचा महान संस्थेतील कार्यकाळ 10 जानेवारीला संपल्यामुळे त्या आपल्या नागपूर जिल्ह्यातील घरी परतल्या. त्यामुळे या पक्षा संदर्भात माहिती देण्यास त्या मेळघाटात उपलब्ध नाही. मात्र त्यांच्यासोबत असणारा वाहन चालक देवेंद्र गोस्वामी सुपर्ब लायरबर्ड संदर्भात माहिती देऊ शकतो. तसेच ज्या ठिकाणी त्याने हा पक्षी पाहिला ते ठिकाण सुद्धा त्याला माहित असल्याचे डॉक्टर आशिष सातव म्हणाले.