महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bird Man : प्राण्यांचे आवाज काढून पर्यावरण संवर्धनाचा संदेश, सुमारे 200 पेक्षा अधिक पक्षांचे आवाज काढणारा अवलिया - Sumedh Waghmare

सुमारे 200 पेक्षा अधिक पक्षांचे आवाज काढण्याची कला सुमेध वाघमारे यांच्याकडे आहे. ताडोबा वनविभागात रोजंदारीवर कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. कोंबड्याची बांग, मोराचा आवाज, कोकिळेचा मधुर सूर, चिमण्यांची चिवचिव असे शेकडो आवाज काढण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे.

Bird Man
सुमेध वाघमारे

By

Published : Jul 18, 2023, 5:26 PM IST

सुमेध वाघमारे यांची प्रतिक्रिया

अमरावती :पक्षांचे आवाज काढणारा बर्डमॅन अशी सुमेध वाघमारे यांची ओळख.कोंबड्याची बांग, मोराचा आवाज, कोकिळेची कुहू-कुहू, चिमण्यांची चिवचिव इतकेच नव्हे तर गाई' म्हशींचे हंबरणे असे सुमारे 200 पेक्षा अधिक पशु-पक्षांचे आवाज मनुष्य काढू शकतो, यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र, विविध प्राण्यांचे हुबेहूब आवाज काढण्याचे कौशल्य सुमेध वाघमारे यांच्याकडे आहे. ताडोबा वनविभागात रोजंदारीवर कर्मचारी म्हणून ते काम करतात. बर्डमॅन म्हणून देखील सुमेध वाघमारे यांना ओळखले जाते. ते अमरावती जिल्ह्यात चिखलदरा येथे आले असता त्यांनी आपल्या कलागुणांसंदर्भात 'ईटीव्ही भारत'शी चर्चा केली.

लहानपणी दुसरीत असताना बकऱ्या चारायचो, म्हशी देखील चारायला न्यायचो. बकऱ्यांचा आवाज मी अगदी तल्लीन होऊन ऐकायचो. तसेच त्यांचा आवाज काढण्याचा प्रयत्न करायचो. त्यानंतर मी अगदी सहज बकऱ्यांचा आवाज काढायला लागलो. म्हशी चालताना देखील मी निरीक्षणातूनच म्हशींचा आवाज काढणे शिकलो. - सुमेध वाघमारे

पुणेकरांनी केले कलेचे कौतुक : मजुरीच्या कामासाठी मी पुण्याला गेलो, असताना तिथे मी कावळ्याचा आणि चिमणीचा आवाज काढायला शिकलो. पुण्यात मला हवी तशी मजुरी मिळेल असे, कोणते काम मिळाले नाही. मात्र, मी कावळ्याचा हूबेहूब आवाज काढत असल्यामुळे अनेकजण मला दहाव्याच्या कार्यक्रमासाठी बोलवायला लागले. पुण्यात मी कावळा चिमणी आणि इतर काही पक्षांचे आवाज काढायला लागलो. माझ्यातील या कलागुणांची पहिल्यांदा पुणेकरांनी स्तुती केली, असे सुमेध वाघमारे म्हणतात.

हिंगोली ते ताडोबा व्हाया पुणे प्रवास : हिंगोली जिल्ह्यात कलगाव येथील रहिवासी असणारे सुमेध हे काम करण्यासाठी काही दिवस पुण्याला होते. पिंपरी चिंचवड महापालिकेत त्यांनी पक्षी आणि पर्यावरण जनजागृतीसाठी काम देखील केले. त्यांचे लग्न झाल्यावर पत्नी, ज्योती ताजणे या शिक्षणाच्या निमित्ताने चंद्रपूर तालुक्यातील नागभीडला आल्या. पत्नी नागभीडला आल्यामुळे मीसुद्धा तिच्या मागे या परिसरात आलो. त्यावेळी ताडोबा वनविभागाने गेटमन पदासाठी जाहिरात काढली. जाहिरात पाहून मी ताडोबाला पोहोचलो. त्या ठिकाणी लेखी परीक्षा दिली. परीक्षा झाल्यावर थेट सहाय्यक वन उपसंचालक जितेंद्र रामगावकर यांची भेट घेऊन त्यांना चिमणी कावळा अशा विविध पक्षांचे आवाज काढून दाखवले.

वन विभागात नोकरी : परीक्षाही उत्तीर्ण झाल्यामुळे मला रोजंदारी तत्त्वावर ताडोबा वन विभागात नोकरी मिळाली. रामगावकर साहेबांनी मला काही पुस्तके वाचायला दिली. ही पुस्तके वाचून आणि अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे माझ्या कलेला शास्त्रीय जोड मिळाली. हिंगोली आणि पुण्यात मी आपल्या शहरी भागात दिसणाऱ्या पक्षांचा आवाज काढायचो. ताडोबात मात्र जंगलातील जवळपास सर्वच पक्षांचा आवाज काढायला शिकलो. या पक्षांच्या आवाजाच्या माध्यमातून आता आमच्या अधिकाऱ्यांच्या परवानगीने पर्यावरण जनजागृती संदर्भात संदेश देऊन आपले कलागुण देखील सादर करतो असे वाघमारे म्हणाले.

पक्षांच्या किलबिलाटासह संगीत वाद्यांची धमाल :मोर, टिटवी, चिमण्या, कावळे, कोंबड्या, कोकिळा, रानकोंबड्या, विविध कीटक, हरीण, वाघ, बिबट अशा अनेक प्राणी पक्षांच्या आवाजासोबतच गिटार, सितार, पिपाणी, सनई अशा वाद्यांचा देखील हुबेहूब आवाज सुमेध वाघमारे काढतात. एखाद्या कार्यक्रमात डीजे वाजवा अगदी तसाच आवाज ते आपल्या मुखातून डीजेचा काढतात.

सयाजी शिंदेंमुळे मिळाली ओळख : माला इयत्ता बारावीपासून अभिनेते सयाजी शिंदे ओळखतात. ते माझे मित्रच आहेत. आता "घर बंदूक बिर्याणी' या सिनेमाच्या शूटिंग निमित्ताने सिनेमातील सर्व कलावंत ताडोबात आले. त्यावेळी अभिनेते सयाजी शिंदे यांनी मला बोलावून घेतले. सयाजी शिंदे, नागराज मंजुळे यांच्या भेटीनंतर माझ्यातील या कलागुणांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचली असे देखील सुमेध वाघमारे सांगतात.

प्राणी, पक्षांवर प्रेम करण्याचा संदेश :आपण जंगलात गेल्यावर अनेक हानीकारक वस्तू तिथेच टाकतो. त्यामुळे इतर प्राण्यांना त्याचा त्रास होते. पर्यटक फिरायला येतात. तेव्हा तेथील प्राण्यांना तेलकट चिवडा, चिप्स खायला देतात. त्यामुळे माकडांसह अनेक प्राण्यावर त्यांचे गंभीर परिणाम होतात. त्यामुळे माणसाचेच नुकसान होत असल्याची भावना वाघमारे यांनी व्यक्त केली आहे. मोबाईल टॉवरमुळे 20% चिमण्या नष्ट होत आहेत. मात्र, यापेक्षा अधिक प्रमाणात माणसांच्या चुकांमुळे चिमण्या दगावत असल्याची खंत सुमेध वाघमारे यांनी व्यक्त केली. मी माझ्या प्रत्येक कार्यक्रमाद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतो. प्रत्येकाने झाडे लावावीत, पक्षी कसे वाचतील याची काळजी घ्यावी, असे आवाहन देखील सुमेध वाघमारे यांनी ' ईटीव्ही भारत'शी बोलताना केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details