अमरावती - राज्यात वीज बिलाबाबत लोकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे लोकांची नाराजी आहे. कोरोना संकटामध्ये आर्थिक ओढाताणीने कंबरडे मोडले असताना सामान्य नागरिकांना आता वीज बिलाचा शॉक मिळत आहे. महावितरणकडून कुठलाही प्रकारचे रीडिंग न घेता अक्षरशः डोळे पांढरे करणारे बिल सामान्य ग्राहकांना दिली जात आहेत. दर्यापूर तालुक्यातील लेहेगाव रेल्वे येथील सुखदेव मालखेडे या मजुराला सप्टेंबर महिन्याचे बिल म्हणून ४९ हजार २०० रुपये आकारण्यात आले आहेत.
महावितरणचा अजब कारभार; मजुराला दिले ४९ हजार २०० रुपयांचे वीज बिल - अमरावती वाढीव वीजबिल न्यूज
सरकारी यंत्रणांच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याच्या अनेक घटना समोर येतात. असाच एक प्रकार अमरावतीच्या लेहेगावमध्ये घडला आहे. एका मजुराला भरमसाठ वीजबिल देण्यात आले आहे.
लॉकडाऊनमध्ये अनेकांना जादा देयकाची विजबिले आली होती. नाईलाजाने ग्राहकांना त्याचा भरणाही करावा लागला. मात्र, आता तर महावितरणचे रिडींग घेण्याचे काम पूर्ववत झाले आहे. तरीह मालखेडे यांना भरमसाठ रकमेचे बिल देण्यात आले आहे. बिलावर त्यांनी केवळ १०७ युनिटचा वापर केल्याचे दिसते आहे, वापरलेली वीज आणि आकारलेले पैसे यात मोठी तफावत आहे. शासन गरिबांना जगू देणार आहे की नाही? असा प्रश्न मालखेडे यांनी उपस्थित केला आहे.
लेहेगावात सतत विजेचा लपंडाव असतो. तरी देखील महावितरण ग्राहकांना भरमसाठ विद्युत बिल देत आहे. त्यामुळे सामान्य माणसांना महावितरण कसली शिक्षा देत आहे? असा प्रश्न लेहेगाववासीयांना पडला आहे.