अमरावती -कोरोनामुळे लावण्यात आलेल्यालॉकडाऊनमुळे मागील एक वर्षापासून सर्वच क्षेत्राला जबर फटका बसला आहे. मागील एक वर्षापासून राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे, शाळेत लहान मुलांची ने-आण करणाऱ्या स्कुल बससुद्धा बंद असल्याने स्कुल बस चालकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. असे असताना अमरावतीमध्ये एका स्कुल बस चालकाने अनोखी शक्कल लढवत स्कुल व्हॅनमध्येच उसाच्या रसाची रसवंती सुरू केली आहे. निखिल मिसळ, असे या स्कुल व्हॅन चालकाचे नाव आहे.
हेही वाचा -'ब्रेक द चेन'ला शिथिलता देण्याची यशोमती ठाकूर यांची मागणी
रसवंती सुरू करायला लागला ३० हजारांचा खर्च
स्कुल व्हॅनमध्ये रसवंती सुरू करणारे निखिल मिसळ सांगतात, कोरोनामुळे शाळा बंद असल्याने पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. कुटुंब चालवायला कुठलेच साधन नव्हते. अशा परिस्थितीत आपल्याच स्कुल व्हॅनमध्ये रसवंती सुरू करण्याचा विचार मनात आला. त्यासाठी तीस हजारांची जुळवाजुळव करून ही रसवंती सुरू केली.