अमरावती :जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील वडगाव फत्तेपूर येथील केंद्रीय शासकीय आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. विद्यार्थ्यांनी सकाळी पोह्याचा नाश्ता केल्यानंतर त्यांना मळमळ, उलट्या सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांना लगेच अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉ. सुरेंद्र ढोले यांनी सांगितले आहे. याबाबत आमदार राजकुमार पटेल, माजी आमदार केवलराम काळे यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली.
अशी आहे घटना :वडगाव येथील एकलव्य निवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी आज सकाळी पोह्यांचा नाश्ता तसेच चहा घेतल्यानंतर त्यांना मळमळ होण्यास सुरवात झाली. विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चिखलदरा येथील एकलव्य आश्रमशाळा गेल्या दोन वर्षांपासून वडगाव फत्तेपूर येथे भाड्याच्या इमारतीत चालवली जात आहे. या शाळेत सहावी ते बारावीपर्यंत जवळपास ३२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना कंत्राटदारामार्फत नाश्ता, भोजन पुरविले जाते. या विद्यार्थ्यांवर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.