अमरावती -संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा दोन वेळा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे. त्यात आता आणखी भर पडली आहे. आज सकाळी दहा वाजतापासून सुरू झालेल्या पेपरसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांचे लॉगइनच होत नसल्याचा आरोप परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा परीक्षा प्रक्रियेत गोंधळ उडाला असून विद्यापीठाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये पुन्हा गोंधळ; लॉग इन होत नसल्याच्या तक्रारी - अमरावती विद्यापीठ परीक्षा तांत्रिक अडचणी
कोरोनामुळे मार्च महिन्यापासून शाळा-महाविद्यालये सर्व बंद आहेत. त्यामुळे परीक्षा देखील झाल्या नाही. यावर शासनाने ऑनलाइन परीक्षांचा पर्याय शोधला आहे. मात्र, त्यातही तांत्रिक अडचणी येत असल्याचे समोर येत आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाअंतर्गत अमरावती विभागातील एक लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षा देत आहेत. परंतु, वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने लॉगइन करण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचण येत आहे. आतापर्यंत विद्यापीठाने परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करत तीन वेळा पुढे ढकलली गेली आहे.
त्यानंतर विद्यापीठाने जाहिर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार आज विद्यापीठाच्या परीक्षेला दहा वाजतापासून सुरुवात होणार होती. त्यासाठी विद्यार्थ्यांनी तयारी देखील केली. मात्र, लॉगइन होत नसल्याने विद्यार्थी संभ्रमात पडलेले आहेत. विद्यापीठाचे सर्व्हरच डाऊन असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.